पिंपरी, पुणे | 7 जानेवारी 2024 : शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत गाजली. त्यांनी खास ठाकरी शैलीत अनेक गोष्टींचा समाचार घेतलाच. पण कलाकारांना काही हिताचे सल्ले सुद्धा दिले. राज ठाकरे यांच्या सुक्ष्म निरीक्षणाची यावेळी चर्चा झाली. न्हावा-शेवा सागरी सेतू हा देशातील सर्वात मोठा सागरी पूल आहे. 12 जानेवारी 2024 रोजी त्याच्या उद्धघाटनाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी या सागरी सेतूविषयी त्यांचे मत मांडले. शिवडी न्हावा-शेवा झाल्याने रायगड बरबाद होईल, या त्यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षाला ही चपराक मानण्यात येत आहे.
सरकारचं सापडलं कोंडीत
मला बुलेट ट्रेनचं काही कळलं नाही. दोन तासात अहमदाबादला जाणार काय करणार. ढोकळा खाणार आणि येणार. करायचं काय. मुंबईत चांगला मिळतो. त्यासाठी एक लाख कोटी कशाला घालवायचे आहे. मराठी माणसाचं चारही बाजूला लक्ष हवं. तो दक्ष असला पाहिजे. मी काल सांगितलं ते आजही सांगेल, अशी टीका त्यांनी बुलटे ट्रेनवर केली.
महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत
ज्याला इतिहास म्हणतो तो भूगोलावर अवलंबुन आहे. भूगोल म्हणजे जमीन. तुमची जमीन ताब्यात घेणं. तुम्ही सर्व युद्ध पाहिली. शिवाजी महाराजाांनी २८ किल्ले दिले. जमीन. म्हणजे भूगोल काबीज करण्यासाठी लढाया झाला त्याला इतिहास म्हणतो. आज महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत आहे. महाराष्ट्राची जमीन पूर्वी युद्ध करून घ्यायचे. आता चालाखीने घेतली जाते. ते तुम्हाला कळत नाही. जमिनीचा तुकडा म्हणजे तुमचं अस्तित्व. तेच तुमच्या हातून घेण्यात येत असल्याची टीका त्यांनी केली.
न्हावा-शेवाबाबत काय भूमिका
न्हावा शेवा सागरी सेतूवर त्यांनी घणाघाती टिका केली. हा सेतू सर्वात अगोदर रायगड जिल्हा बरबाद करेल, असे वक्तव्य त्यांनी केले. बाहेरील लोक येऊन रायगडमध्ये जमिनी खरेदी करत आहेत. स्थानिक लोक जमिनी विकत आहे. हे राज्यकर्त्यांना दिसत नाही का, असा सवाल त्यांनी केला. जमिनी विकणारे हेच लोक पुढे नोकर होतील. या लोकांच्या हाताखाली काम करतील. हा डाव ओळखण्याचे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.