पुणे : राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) औरंगाबाद सभेची सध्या जोरदार हवा आहे. उद्या सकाळी पुण्याहून राज ठाकरे औरंगाबादच्या सभेसाठी रवाना होणार आहेत. राज ठाकरे औरंगाबादकडे रवाना होण्याआधी पुण्यात त्यांच्या घरी मंत्रोच्चारही (Chant) होणार आहे. अशीही माहिती मनसेकडून देण्यात आली आहे. तसेच उद्या सकाळी राज ठाकरे यांच्या पुण्यातील राजमहाल या निवासस्थानी शंभर पुरोहित येणार आहेत. औरंगाबादच्या सभेपूर्वी (Raj Thackeray Aurangabad Speech)या गुरुजींच्या माध्यमातून मंत्रोच्चारासह आशिर्वाद देणार आहेत, त्यासाठी मनसेने पोस्टरही छापलं आहे. त्या पोस्टवर हिदूजननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे. यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी शेकडो गुरूजन, असा मजकूर छापण्यात आला आहे. तसेच यावर त्याची वेळ आणि पत्ताही देण्यात आला आहे. तसेच आपणही या असे आवाहन जनतेला करण्यात आले आहे.
अमित ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल होताच तयारीचा आढावा घेतला आहे. मनसेचे नेतेही आधीपासूनच औरंगाबादेत ठाण मांडून बसले आहेत. अमित ठाकरे यांनी माहिती घेत नियोजन चांगलं करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सभेसाठी किती लोक येतील तेवढं नियोजन आहे का ? तयारी कशी आहे? जाणून माहिती घेतली आहे. अमित ठाकरेंच्या उपस्थितीत उद्या विद्यार्थी सेनेत 200 पक्षप्रवेश होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेच्या निमित्ताने औरंंगाबादेत मनसेला आणखी बळ मिळताना दिसत आहे.
राज ठाकरे औरंगाबादला सभेसाठी जाण्यासाठी नगरहून जाणार आहेत. त्यांचे अहमदनगर मनसेकडून छत्रपती शिवाजी पुतळ्याच्या येथे सकळी 10 वाजता स्वागत केलं जाणार आहे. या दौऱ्यावेळी राज ठाकरेंसोबत मनसे कार्यकर्त्यांचा मोठा ताफाही असेल. अशीही माहिती देण्यात आली आहे.
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीचं आमंत्रण दिलं आहे. त्यामुळे राज ठाकरे हे निमंत्रण स्वीकारणार का? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आम्ही पक्षाच्या विचारधारेला विरोध करतो. मात्र आम्ही धर्माविरोधत कधी बोलत नाही. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधातही ठोस भूमिका घेतली आहे. कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचे पालन जरूर व्हावे. मात्र सरकारी यंत्रणांनी पुढे यावं. आम्हाला न्यायालय आणि पोलिसांवर विश्वास आहे. औरंगाबादेत आम्हाला शांतता प्रस्थापित करायची आहे, असेही जलील यावेळी म्हणाले.