पुणे : औरंगाबाद आणि मराठवाड्याला सध्या भगवं स्वरुप प्राप्त झालं आहे. राज ठाकरेंच्या सभेसाठी (Raj Thackeray) जोरदार तयारीही करण्यात आलीय. त्यासाठी पोलीसांचा हजारोंच्या (Aurangabad Police) संख्येन फौजफाटा तैनात असणार आहे. राज ठाकरे उद्या पुण्यातून औरंगाबादकडे रवाना होतील. मात्र राज ठाकरेंची ही एन्ट्री (Raj Thackeray Entry) साधीसुधी नसणार आहे. तर राज ठाकरे जबरदस्त अंदाजात औरंगाबादेत एन्ट्री करणार आहेत. राज ठाकरेंच्या औरंगाबादेतल्या एन्ट्रीबाबत पुणे मनसेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ बाबर यांनी काही माहिती दिली आहे. राज ठाकरे उद्या सकाळी औरंगाबादच्या दिशेने निघणार आहेत. मात्र यावेळी 100 ते 150 गाड्या राज ठाकरेंच्या ताफ्यात असतील, अशी माहिती बाबर यांनी दिली आहे. तर त्याआधी महंतांद्वारे मंत्रोच्चार आणि आशीर्वादही राज ठाकरे घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राज ठाकरेंच्या पुणे ते औरंगाबाद प्रवासाबाबतही साईनाथ बाबर यांनी माहिती दिली आहे. औरंगाबाद दौऱ्यादरमान राज ठाकरे वडू येथे जावून संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. तसेच सभेच्या नियम आणि अटीबाबत बोलताना बाबर म्हणाले, नियम आणि अटी प्रत्येक सभेला असतात. राज ठाकरेंना मानणारी लोक खूप आहेत. त्यामुळे जेव्हा लोक येतील, त्याला रॅलीचे स्वरुप येईल राज ठाकरेंनी आधीच सांगितले आहे की आम्हाला दंगल करायची नाही. जे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे ते सर्वांनी पाळले पाहिजे. तसेच राज ठाकरेंच्या सभेची आम्हालाही उत्सुकता आहे. यासभेत राज ठाकरेंचं वादळ कुठल्या राजकीय विरोधाला घेवून जाते ते बघायचे आहे, असे म्हणत त्यांनी या सभेबाबत संकेत दिले आहेत.
राज ठाकरे औरंगाबादकडे रवाना होण्याआधी पुण्यात त्यांच्या घरी मंत्रोच्चारही होणार आहे. उद्या सकाळी 8 वाजता राज ठाकरे यांच्या पुण्यातील राजमहाल या निवासस्थानी शंभर पुरोहित येणार आहेत. औरंगाबादच्या सभेपूर्वी या गुरुजींच्या माध्यमातून मंत्रोच्चारासह आशिर्वाद देणार आहेत, अशीही माहिती मनसेकडून देण्यात आली आहे. राज यांच्या सभेसाठी जिल्हा परिषद मैदान आणि कर्णपुरा परिसरात वाहने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मिलकॉर्नर ते औरंगपूर, भडकल गेट ते महापालिका आणि खडकेश्वर ते भडकल गेट हे तीन रस्ते पूर्णपणे बंद राहणार, असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचे पोलिसांचे संकेत मिळाले आहेत.