पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा पुण्यात पुण्यात अखिल उत्तर भारतीय संघटनेने सत्कार केला आहे. संघटनेने राज ठाकरे यांच्या पुण्यातील निवासस्थान राजमहाल याठिकाणी जाऊन त्यांचा सत्कार केला आहे. उत्तर भारतीय संघटनेचे रवींद्र प्रजापती यांनी त्यांचे स्वागत केले आहे. त्यांच्यासोबत यावेळी मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबरदेखील होते. राज ठाकरे पुणे (Pune) मुक्कामी होते. आपल्या वैयक्तिक कारणासाठी ते काल मुंबईहून पुण्याला आहे होते. तर काहीवेळापूर्वीच ते पुण्यातून निघाले. तत्पूर्वी उत्तर भारतीय संघटनेने त्यांचा सत्कार केला आहे. दुसरीकडे अयोध्या दौऱ्याला भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग (Brij Bhushan Sharan Singh) यांनी विरोध केला आहे. उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. एकूणच उत्तर भारतीयांत यावरून एकवाक्यता दिसून येत नाही, हेच स्पष्ट होत आहे.
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच बदललेल्या भूमिकेचे स्वागतच उत्तर भारतीय संघटनेने केले आहे. राज ठाकरे अयोध्या दौऱ्याला जाणार आहेत. ज्या परप्रांतियांना काही वर्षांपूर्वी त्यांनी मारहाण केली, त्यांच्याविरोधात भूमिका घेतली, आज ते त्याच राज्यात जाणार आहेत. अद्याप त्यांनी उत्तर भारतीयांविषयीची भूमिका मांडली नाही. मात्र प्रत्येकवेळी भूमिका बदलणारे राज ठाकरे यांच्यादृष्टीने सध्यातरी हिंदुत्वाचाच मुद्दा महत्त्वाचा दिसत आहे. त्यामुळे त्यांनी आपली परप्रांतियांविषयीची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही राजकीय पक्षांकडून, विरोधकांकडून होत आहे, त्यावर अद्याप राज ठाकरे काहीही बोलले नाहीत.
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करताना ब्रिजभूषण यांनी म्हटले, की राज ठाकरे जोपर्यंत उत्तर भारतीय लोकांची माफी मागत नाहीत तोपर्यंत मी एअरपोर्टवरही उतरू देणार नाही. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मी सल्ला देऊ शकत नाही, पण लोकांच्या भावना लक्षात घेता मी त्यांना विनंती केली आहे, की जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत तुम्ही त्यांना भेटू नका. यावर ना आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया आली ना राज ठाकरेंची. त्यामुळे जसजसा अयोध्या दौरा जवळ येत आहे, तसे राजकारण अधिकच तापत असल्याचे दिसून येत आहे.