पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुण्यातील आपल्या खासगी कामाचा दौरा आटोपून आज मुंबईला रवाना होण्याची शक्यता आहे. काल ते वैयक्तिक कारणास्तव पुण्याला आहे होते. ते पुण्यातील त्यांच्या राजमहाल या निवासस्थानी आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला नाही. तर उलट एक पत्रक प्रसिद्ध करून प्रसारमाध्यमांशी बोलू नये, असे म्हटले होते. पुण्यात येताच मनसैनिकांसाठी त्यांनी पत्रक प्रसिद्ध केले होते. यात अयोध्या (Ayodhya) दौऱ्याबाबत प्रसारमाध्यमांशी कोणीही बोलू नये, अशा सूचना दिल्या होत्या. राज ठाकरे यांनी काढलेल्या पत्रकाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. अयोध्या दौऱ्याबाबत कोणीही बोलण्याचा शहाणपणा करू नये. त्यासाठी प्रवक्ते नेमलेले आहेत, असे पत्रात नमूद करण्यात आले होते. आता हा रोख नेमका कोणाकडे होता, हे मात्र समजू शकले नसले, तरी वसंत मोरे (Vasant More) यांच्यावरच तो असल्याची चर्चा सुरू आहे.
हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून एकतर राज्यातले वातावरण ढवळून निघाले असताना राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरूनही राजकारण सुरू झाले आहे. शिवसेनेने अयोध्येत बॅनरबाजी सुरू केली आहे. असली आ रहा है, नकली से सावधान अशी बॅनर्स दिसून येत आहेत. तर भाजपाचे नेते, खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत, तोवर हा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी टीव्ही नाइनच्या कार्यक्रमातही सहभाग घेतला होता.
वसंत मोरे यांनी कात्रज भागातील त्यांच्या ऑफिससमोरील हनुमान मंदिरात काल महाआरतीचे आयोजन केले होते. त्यावेळीही राज ठाकरे तेथे दिसले नाहीत. तत्पूर्वी दुपारी त्यांना विचारले असता, राज ठाकरे पुण्याला येत असल्याची कोणतीही कल्पना नसल्याचे वसंत मोरे म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे काही प्रतिक्रिया देतात का, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.