पुणे : रक्षाबंधन (Raksha Bandhan) म्हटले, की बहीण भावाच्या बंधनांचा सण…! बहिणीच्या रक्षणाची शपथ देऊन बहीण राखीचा (Rakhi) धागा भावाच्या हाती बांधते आणि सदैव माझ्या पाठीशी उभे राहण्याचे वचन भावाकडून घेते… मात्र बहिणींला भाऊच नसल्याने निराश न होता बहीणच भावाची भूमिका बजावत आहे. पुण्यातील राजगुरूनगर (Rajgurunagar) येथील तनिष्का आणि फाल्गुनी गाडगे या दोन चिमुकल्यांना भाऊ नाही. मात्र भाऊ नसल्याची खंत न ठेवता झाशीची राणी, राजमाता जिजाऊ, आहिल्यादेवी, सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा घेऊन एकमेकींना राखी बांधून त्यांनी समाजातील अनिष्ट रूढी आणि वाईट प्रवृत्तीपासून रक्षा करण्याचे जणू वचनच दिले आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (75 वर्ष) साजरा होत असताना मुलीही मागे नाही, असाच संदेश देत आपल्या चिमुकल्या बहिणीच्या रक्षण करण्याची जबाबदारी दुसऱ्या चिमुकलीने घेतली.
आपल्या छोट्या बहिणीला राखी बांधत तिच्या रक्षणाची जबाबदारी बहिणीने घेतली. बंधनाचा हा धागा हाती बांधला. या राखीच्या धाग्याच्या बंधनातून बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी आता बहिणीनेच स्वीकारली आहे. समाजात आजही अनेक ठिकाणी नकोशी पाहायला मिळतात. जन्मदातेच लेकीला नकोशी म्हणून तिला दूर करतात. काही निष्ठूर पालक तर रस्त्यावर सोडून निर्दयीपणे निघून जातात. जिवंतपणीच लेकीला मरणाच्या यातना देणाऱ्यांनी या दोन बहिणींच्या प्रेमाचा आदर्श घ्यावा, हाच संदेश या चिमुकल्या बहिणींच्या रक्षाबंधनातून समोर आला आहे.
देशभर आज रक्षाबंधनाचा उत्साह आहे. सेलेब्रिटी, राजकारणी, खेळाडू अशा विविध मान्यवरांकडे रक्षाबंधन साजरे होत आहे. मागील दोन वर्ष कोरोनामुळे भावाला आपल्या बहिणीकडे जाता आले नाही. त्यामुळे खरे तर ऑनलाइन पद्धतीनेच अनेकांनी रक्षाबंधन साजरे करण्यावर भर दिला. प्रत्यक्ष भेट टाळण्याकडे सर्वांचा भर होता. यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे रक्षाबंधनासह आगामी सर्वच सण उत्साहात, एकत्र आणि कुटुंबासह साजरे करण्यात येणार असल्यामुळे सर्वांमध्येच उत्साह आहे. भाऊ राखी बांधायला बहिणीकडे जात आहे. तर ज्या बहिणींना भाऊ नाही, त्या आपल्या चिमुकल्या बहिणींनाच राखी बांधून हा सण उत्साहात साजरा करत आहेत.