शिरूर, पुणे : रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) पोलीस ठाणे हद्दीत कामगारांचे मोबाइल चोरी करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचे 40 मोबाइल संच जप्त (Mobiles seized) करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांनी दिली. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत अनेक कामगार वास्तव्यास आहेत. अनेक कामगार हे शिफ्टनुसार काम करीत असतात. कामाच्या वेळा प्रत्येकाच्या वेगळ्या असल्याने कामगार हे खोलीचा दरवाजा उघडा ठेवून बऱ्याचदा झोपतात. हीच संधी साधून काहीजण मोबाइल चोरीचा प्रयत्न करतात. गेल्या काही दिवसांपासून अशा चोऱ्यांचे प्रमाण एमआयडीसी परिसरात वाढत असल्याने चोरीचा छडा लावणे गरजेचे होते. कामगारांनीही तशी मागणी केली होती. त्यानुसार रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला (Minor boy) अटक केली आहे.
शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील हे कामगार रांजणगाव, कारेगाव, ढोकसांगवी याठिकाणी राहतात. त्यांच्या खोल्यांमधले मोबाइल चोरून हा अल्पवयीन मुलगा ते विकत असे. साधारणपणे आठ तास काम करून हे कामगार घरी परतत असतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने दरवाजे, खिडक्या उघडे ठेवले जातात. याचाच गैरफायदा या चोरांकडून घेतला जातो. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता या चोरीचा प्रताप उघड झाला आहे. रांजणगाव MIDC पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्याच्याकडून 4 लाख 50 हजार किंमतीचे जवळपास 40 महागडे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. स्थानिक पोलीस स्टेशनच्या हद्दीत सहा मोबाइल चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत. आता या मोबाइल मालकांचा शोध घेऊन त्यांना ते दिले जाणार आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने केली. दरम्यान, कामगारांनी रात्रीच्या वेळी खोलीचे दरवाजे आणि खिडक्या व्यवस्थित लावल्याची दक्षता घ्यावी, जेणेकरून मोबाइल चोरीचे प्रकार घडणार नाहीत, असे आवाहन रांजणगाव पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.