पुणे : पुण्यात उन्हाचा चटका वाढला आहे. या रणरणत्या उन्हामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात कमाल तापमानात (Temperatute) 1.2 अंशांनी वाढ झाली आहे. पुण्यात गुरुवारी 41.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर आज शहरातील तापमानाचा पारा 42 अंशावर पोहोचणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे. एप्रिल (April) महिन्यातील ही तापमानातील वाढ उच्चांकीच म्हणावी लागेल. मागील काही दिवसांपासून उकाड्याने पुणेकर हैराण होतेच. मात्र आता उन्हाच्या चटक्याची भर यात पडली असल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे. मध्यंतरी पावसाच्या (Rain) शिडकाव्याने काहीसा दिलासा मिळाला होता. त्यादरम्यान तापमानात घटही झाली होती. तापमान 40 अंशांच्या आतच होते. पुण्यात या महिन्याच्या शेवटपर्यंत अंशतः ढगाळ हवामान कायम राहील, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.
गेल्या दशकातील डेटा सूचित करतो, की एप्रिलमध्ये दिवसाचे तापमान 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. तीन दिवसांपूर्वीच हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले होते, की या आठवड्याच्या सुरुवातीला पाषाणसारख्या भागात दिवसाचे तापमान 40.3 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. चिंचवड आणि मगरपट्टा येथे दिवसाचे तापमान अनुक्रमे 41.3 आणि 41 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तर चिंचवड आणि लव्हाळे या शहराच्या इतर भागांमध्ये दिवसाचे तापमान 41 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले होते.
28 एप्रिलपासून मध्य महाराष्ट्रातील काही भागात महिनाअखेरपर्यंत उष्णतेची लाट सदृश परिस्थिती जाणवू शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला होता. तर पुण्यात पारा 40 अंश सेल्सिअसच्या आसपास जाऊ शकतो, असेही हवामान विभागाने म्हटले होते. त्या अंदाजापेक्षा अधिकची वाढ पुण्यात झालेली पाहायला मिळत आहे. जवळपास 42 अंशांच्या आसपास पारा वाढल्याने पुणेकरांची काळजीही वाढली आहे. आता मेची धास्ती पुणेकरांना लागून राहिली आहे.