पुणे : रस्त्यावरून जाणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाचा मोबाइल हिसकावल्याचा प्रकार (Mobile stolen) घडला आहे. तर या घटनेत ज्येष्ठ नागरिक जखमी झाला आहे. खराडीत हा प्रकार घडला आहे. मोटारसायकलवरून आलेल्या तीन चोरट्यांनी खराडी येथील चौधरी वस्ती येथे रविवारी पहाटे 60 वर्षीय सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्याचा मोबाइल हिसकावून घेतला. या हल्ल्यात या व्यक्तीच्या उजव्या हाताला मोठी जखम (Injured) झाली आहे. या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकूण 20 टाके पडल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी सांगितले, की बबन दहिफळे हे सकाळी 6.05च्या सुमारास नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला (Morning walk) जात असताना टस्कन हाऊसिंग सोसायटीच्या बाहेर हे तिघे त्यांच्याजवळ आले. ते मोबाइलवर बातम्या ऐकत होते. त्याचवेळी त्यांचा फोन हिसकावून घेण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सेवानिवृत्त विभागीय सचिव आणि खराडी येथील शांतीनगर येथील रहिवासी असलेले बबन दहिफळे यांनी याबाबत पोलिसांना सांगितले आहे. ते सकाळी फिरत असताना चोरट्यांनी हल्ला करत मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फोन घट्ट पकडला आणि हल्लेखोराचा हात खेचला. त्यामुळे तिघेही दुचाकीवरून खाली पडले. मात्र, हल्लेखोरांपैकी एकाने उठून दहिफळे यांच्या उजव्या हातावर विळ्याने वार केले, त्यामुळे मोबाइलवरून ज्येष्ठाचा हात सैल झाला. या तिघांनी 10 हजार रुपये किंमतीचा फोन घेऊन खराडी-मुंढवा बायपासकडे निघून गेले, असे चंदननगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक (गुन्हे) रवींद्र कदम यांनी सांगितले.
हल्ल्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलीस दोषींना अटक करतील. दरोडेखोर 25 ते 27 वयोगटातील होते. त्यांनी हेल्मेट घातले नव्हते किंवा मास्क वापरले नव्हते. एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दहिफळे यांनी सांगितले, की माझा हात 8 ते 10 इंच कापल्यामुळे माझ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. मी त्याचा हात धरल्याने चोरट्यांनी माझ्यावर विळा मारला. हल्ला केल्यानंतर फोन पडताच दुचाकीवरील तिसऱ्या व्यक्तीने तो उचलला आणि तिघे पळून गेले.
येरवडा विभागाचे एसीपी किशोर जाधव यांनी सांगितले, की दहिफळे घरी पोहोचले आणि त्यांच्या मुलाच्या मदतीने ते एका खासगी रुग्णालयात गेले. सकाळी 8च्या सुमारास आम्हाला रुग्णालयातून दूरध्वनी आल्यानंतर आम्हाला चोरीची माहिती मिळाली. तपासणी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. हल्ल्याच्या वेळी परिसरातील शाळा आणि दुकाने बंद होती. या परिसरात नवीन गृहनिर्माण सोसायट्या उभ्या राहिल्या आहेत, पण घटना घडली त्यावेळी प्रत्यक्षदर्शी कोणीही नव्हते. चंदननगर पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.