आळंदी, पुणे : माऊलींच्या दर्शनाला येथे आलो आहे. संतांनी जोडण्यास सांगितले. काही जणांना तोडण्यात रस असतो. आम्ही जोडण्याचे काम करतो, असा टोला कर्जतचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपाला लगावला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर आळंदीत रोहित पवार माऊलींच्या दर्शनासाठी आले, त्यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करत भाजपावर (BJP) हल्लाबोल केला. विधान परिषद निवडणूक आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडी यावर सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली. आपण याठिकाणी दर्शनासाठी आलो आहोत. सध्या ज्या काही राजकीय घडामोडी होत आहे, जे कोणी नॉट रिचेबल (Not Reachable) आहे, ते समोर आल्यानंतरच काय ते कळेल, असे ते म्हणाले. तर आम्ही जोडण्याचे काम करतो, काही जण तोडण्याच्या कामास इच्छुक असतात, असा टोला त्यांनी भाजपाला लगावला.
हे पदाधिकाऱ्यांची निवडणूक होती. काही ठराविक लोकांनी निवडणूक होती. हे राजकारण वेगळे असते. लोकांमधून निवडून येताना काही प्रमाणात सोपे असते. लोक तुमचे काम पटले तर तुम्हाला निवडून देत असतात. पण पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत वेगवेगळ्या प्रकारच्या नाराजी असतात. त्या विकासकामे किंवा इतर कोणत्याही बाबतीत असू शकतात. त्यामुळे कोणी कुठेतरी, इकडेतिकडे जाऊ शकतात. तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असल्याचे ते म्हणाले.
एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत. ते कुठे आहेत, काय करणार आहेत, या शक्यता वर्तवण्यापेक्षा ते जेव्हा समोर येतील, त्यांच्या नेत्यांना भेटतील, त्याचवेळी काय सत्य आहे ते समोर येईल, असे ते म्हणाले. आकडेवाडीचे समीकरण सध्या आहे. आता कोणती मते शिफ्ट झाली, ते संध्याकाळपर्यंत कळेल. भाजपाने अविश्वास ठराव आणण्याती तयारी केली यावर ते म्हणाले, की आम्ही शेवटपर्यंत जोडण्याचाच विचार करतो. आपण ज्याठिकाणी आहोत (आळंदी) तिथे संतांनी आपल्याला एकच शिकवले आहे, की जोडले पाहिजे. काही लोक तोडण्यामध्ये जास्त इच्छुक आहेत. त्यामुळे काही लोक तोडण्याचा प्रयत्न करतील, आम्ही जोडण्याचा प्रयत्न करू. यात ज्या कोणाचा विजय होईल, ते आपल्याला स्वीकारावे लागेल, असे रोहित पवार म्हणाले.