पुणे | 31 जुलै 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्या लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार आहे. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जाणार की नाही यावर अजूनही सस्पेन्स आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि काँग्रेसने शरद पवार यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावू नये अशी विनंती केली आहे. त्यामुळे शरद पवार जाणार की नाही? याचे गूढ वाढलेलं असतानाच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या एका विधानाने शरद पवार हे उद्याच्या कार्यक्रमाला जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
रोहित पवार मीडियाशी संवाद साधत होते. उद्याच्या कार्यक्रमाला जाऊन काही संभ्रम निर्माण होइल असं मला वाटत नाही. आयोजकांनी शरद पवार यांच्या माध्यमातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कार्यक्रमाला बोलावलं आहे. कार्यक्रमाला येणार म्हणून शरद पवार यांनी आयोजकांना शब्द दिला आहे. कार्यक्रम वेगळा आणि राजकीय भूमिका वेगळी असते. याला राजकीय भूमिकेतून पाहू नये, असं रोहित पवार म्हणाले. त्यामुळे शरद पवार हे उद्याच्या कार्यक्रमाला जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
उद्याच्या कार्यक्रमाला शरद पवार गेले तरी त्याकडे राजकीय दृष्टीने पाहू नये. पवारांनी राजकारण आणि समाजकारण एकत्र केलं नाही. या संस्थेने अनेक जणांना गौरवलं आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला सध्याच्या राजकीय परिस्थितीशी जोडू नये. राजकीय घटना घडामोडींच्या आधी हा कार्यक्रम निश्चित झाला आहे, असं सांगतानाच उद्या कोण काय बोलेल, काय भूमिका घेतील हे पाहावं लागेल. उद्या माझे आणि तमाम युवकांचे कान मोदींच्या भाषणाकडे लागले आहे. मोदी उद्या राज्याला नवे प्रकल्प देतील अशी आशा आहे, असंही ते म्हणाले.
एक व्यक्ती मध्येच येतो आणि नेहमी बोलतो. हा व्यक्ती वादग्रस्त आहे. मग त्या व्यक्तीवर कारवाई का होत नाही. मनोहर भिडे वारंवार अशीच चुकीची विधानं करतात. सरकारच भिडेंना पाठी घालतंय की काय अशी आम्हाला शंका आहे. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. मुख्य मुद्दे काढले की ही व्यक्ती बोलत असते, असं रोहित पवार म्हणाले.
भिडेंनी महात्मा गांधी यांच्याविरोधात जेव्हा विधानं केली तेव्हाच आम्ही बोललो होतो. त्यावर चर्चा करण्याची मागणी केली होती. काही तरुण समाजमाध्यमांवर लिहितात तर त्यांच्यावर कारवाई होते. पुरोगामी विचारांच्या युवकांवर कारवाई केली जाते. मग भिडेंवर कारवाई का होत नाही? भिडेंना अटक झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. महापुरुषांच्या विरोधात भिडे बोलत असतील तर त्यांच्यावर 100 टक्के कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.