पुणे : जात (Caste) हा महाभयंकर रोग आहे, असे तुम्ही म्हणता. मग जातीच्या नावावर तुम्हाला जाहीर झालेला पुरस्कार तुम्ही स्वीकारणार की नाही हे तुम्हीच ठरवा, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाचे सचिन खरात (Sachin Kharat)म्हणाले आहेत. ते पुण्यात बोलत होते. शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांना जाहीर झालेल्या ब्राह्मणभूषण पुरस्कारावर त्यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, की पुणे येथील संस्थेने मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांना ब्राम्हणभूषण पुरस्कार जाहीर केला आहे, असे समजते. अभिनेते शरद पोंक्षे म्हणतात, जात हा महाभयंकर मोठा रोग आहे. त्यामुळे जातीच्या नावाने जाहीर झालेला पुरस्कार घ्यावयाचा का नाही हे तुम्हीच ठरवा. म्हणजे तुम्ही कोणत्या विचारधारेचे आहात, हे महाराष्ट्र राज्यातील जनतेला समजेल, असे ते म्हणाले आहेत.
आम्ही सारे ब्राह्मण पाक्षिक व ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका मासिक या दोन्ही नियतकालिकांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. संस्थेतर्फे यावर्षीचा ब्राह्मण भूषण पुरस्कार वि. दा. सावरकरांचा अभिमान असणारे अभिनेते शरद पोंक्षे यांना तर इंदुमती-वसंत करिअर भूषण पुरस्कार लेखक, सिनेदिग्ग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना देण्यात येणार आहे. याप्रसंगी शिवसंघ प्रतिष्ठानचे संस्थापक कॅप्टन निलेश गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून तर बुलडाणा अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. आज संध्याकाळी 5.30 वाजता आबासाहेब गरवारे महाविद्यालय सभागृहात हा कार्यक्रम होत आहे. मासिकाचे मुख्य संपादक भालचंद्र कुलकर्णी यांनी याविषयी माहिती दिली आहे.
संध्याकाळी होणाऱ्या पुरस्काराचे मानपत्र, पुणेरी पगडी व उपरणे असे स्वरूप असणार आहे. तर यंदाचे हे आठवे वर्ष आहे. या कार्यक्रमात शरद पोंक्षे लिखित मी आणि नथुराम या पुस्तकाच्या 10व्या आवृत्तीचे लोकार्पण होणार असून त्यांची प्रकट मुलाखतही होणार आहे. सुधीर गाडगीळ ही मुलाखत घेणार आहेत. ब्राह्मण समाजाच्या उन्नतीकरिता आणि प्रगतीकरिता 2011पासून आम्ही सारे ब्राह्मण हे पाक्षिक व 2005पासून ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका हे मासिक सुरू झाले आहे. दरम्यान, जातीच्या नावावर असे पुरस्कार घेणार की नाही, असा सवाल यानिमित्ताने सचिन खरात यांनी पोंक्षे यांना केला आहे. पोंक्षे यांची यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.