पुणे : पुण्यात झालेल्या अघोरी प्रकाराची राज्य महिला आयोगाने (Maharashtra State Commission for Woman) दखल घेतली आहे. अंधश्रद्धेतून आपल्या पत्नीला सगळ्यांसमोर अंघोळ करण्यास पतीनेच भाग पाडल्याची संतापजनक घटना समोर आली होती. आता या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाकडून घेण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. अंधश्रद्धेच्या विरोधात सर्वसमावेशक धोरण तयार करण्याची मागणी यामाध्यमातून त्यांनी केली आहे. विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनाही हे पत्र पाठवण्यात आले आहे. राज्यात महिला, मुलींवरच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अंधश्रद्धेतून (Superstition) अनेक अघोरी प्रकार होत आहेत. याविषयी गांभीर्याने पाहावे तसेच सर्वसमावेशक असे धोरण आखावे, जेणेकरून अत्याचाराच्या तसेच अघोरी प्रकाराच्या घटना रोखण्यास मदत होईल, असे म्हटले आहे.
राज्य महिला आयोगाची स्थापना राज्य महिला आयोग अधिनियम 1993अन्वये करण्यात आली. ही एक वैधानिक संस्था आहे. पीडित महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच स्त्रियांवर परिणाम करणाऱ्या कायद्यांचे परिणामकारकरित्या संनियंत्रण आणि अंमलबजावणी करण्यासाठी, स्त्रियांचा समाजातील दर्जा आणि प्रतिष्ठा सुधारणे आणि उंचावणे या गोष्टींशी संबंधित सर्व बाबींवर शासनाला सल्ला देणे आयोगाचे उद्दिष्ट आहे. तसेच राज्य महिला आयोग अधिनियम 1993मधील कलम 10(1)(जे)नुसार स्त्रियांना समाजिक आणि आर्थिक विकासाच्या नियोजन प्रक्रियेत सहभागी होण्यास सक्रिय करणे हा आयोगाचा उद्देश आहे.
सध्याच्या काळातील काही घटना बघता अंधश्रद्धेमुळे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. समाजाच्या या मानसिकतेमध्ये बदल होणे हे अत्यावश्यक आहे.1/2@CMOMaharashtra @mieknathshinde pic.twitter.com/ktAIqrOkiq
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) August 22, 2022
महिलांविषयक समस्यांमध्ये मागील काही काळापासून सातत्याने वाढ होत आहे. अंधश्रद्धेतून महिलांची, मुलींची विटंबना प्रसंगी हत्या अशा अनेक घटना समोर येत आहे. नागपुरात मांत्रिकाच्या सल्ल्याने सहा वर्षे चिमुकलीची आई-वडिलांकडून हत्या तसेच पुणे येथे अघोरी पूजा करत पत्नीला सर्वांसमक्ष अंघोळ करायला भाग पाडले, अशा घटना घडत आहेत. या सर्व घटना अतिशय निंदनीय असून याचे मूळ अंधश्रद्धा आहे. त्यामुळे यासंबंधी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात, अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.