पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्याविषयी आक्षेपार्ह कमेंट केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी रुपाली चाकणकर यांच्याकडे ही तक्रार आधी केली होती. या तक्रारीनुसार आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून बार्शीतील एका तरुणावर पहिला गुन्हा (Filed a case) दाखल करण्यात आला आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी रुपाली चाकणकर यांनी मी वटपूजन केले नाही, वृक्षारोपण केले, अशा आशयाची फेसबुक पोस्ट केली होती. या पोस्टवर अनेक आक्षेपार्ह कमेंट्स करण्यात आल्या आहेत. त्यानंतर शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांनी अशा विकृतींवर कारवाई का करत नाहीत, अशी तक्रार चाकणकर यांच्याकडे केली होती. दरम्यान, आता याविषयी पहिला गुन्हा दाखल झाला आहे.
राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून अशाप्रकारची आलेली ही पहिलीच तक्रार आहे. समाजामध्ये संवेदना आहेत. हेरंब कुलकर्णी यांनी घेतलेल्या भूमिकेचे मनापासून स्वागत करते, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या. लग्न झाल्यापासून एकदाही वडाचे पूजन केले नाही. दोन दिवसापूर्वी विधवा प्रथाबंदच्या कार्यक्रमात वटपौर्णिमा आणि त्याचे सत्य यासंबंधी महाराष्ट्रभर फिरताना आलेला अनुभव यावर भाषण केले होते. त्यातीलच काही मुद्दे घेऊन कमेंट्स करण्यात आल्या.
तुम्ही वड पुजू नका, असे मी कुठेही म्हटलेले नाही. मी हिंदू धर्म बुडवला, मातीत घातला, यासह न सांगता येणाऱ्याही काही कमेंट्स आहेत. टीका करणाऱ्यांचे आश्चर्य वाटले, नाही. मात्र किळस आली, कीव आली. धर्माच्या नावाखाली तुम्ही केलेली टीका पाहता धर्म हेच शिकवतो का, एखाद्या स्त्रीवर अशा पातळीवर जाऊन टीका करणे म्हणजे पूर्ण वस्त्रात असलेल्या महिलेला विवस्त्र करणे अशापद्धतीच्या या टीका होत्या. यातील सत्तर टक्के टीका या स्वत:च्या प्रोफाइलवर मुलींचे फोटो ठेवणारे, प्रोफाइल लॉक करून ठेवणाऱ्या अशा फेक प्रोफाइल असणाऱ्यांच्याच होत्या, असा पुरुषार्ध दाखवून काय सिद्ध करायचे आहे, असा सवालही चाकणकर म्हणाल्या.
आम्हाला वडाच्या झाडाला फेऱ्या मारणारी सत्यवानची सावित्री फार लवकर समजली. पण आमच्या शिक्षणासाठी स्वतःच्या अंगाखांद्यावर शेणामातीचे गोळे झेलणारी ज्योतिबाची सावित्री अजूनही समजली नाही, हे आमचे दुर्दैव…!! वडाच्या फांद्या तोडून, वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून निसर्गाचा समतोल बिघडवण्यापेक्षा चार वडाची झाडे लावून वटपौर्णिमा साजरी केल्याचा आनंद निश्चितच समाधानकारक आहे.