पुणे: महापुरुषांच्या सातत्याने होत असलेल्या अवमानाविरोधात महाविकास आघाडीने भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चासाठी पुण्यातून राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते सकाळीच मुंबईच्या दिशेने निघाले. रुपाली पाटील ठोंबरे या सुद्धा मोर्चाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपवर जोरदार हल्ला केला. राज्यपालांविरोधात भाजपने काळे झेंडे का दाखवले नाही. भाजप फक्त सोयीचं राजकारण करत आहे, अशी टीका करतानाच मनसेचे नेते राज ठाकरे हे राज्यपालांच्या विधानावर गप्प का बसले? असा सवाल रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.
मनसेची परिस्थिती म्हणजे काय सोडायचं आणि काय धरायचं अशी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की… म्हटल्यानंतर ज्यांच्या तोंडून आपोआप जय असा उच्चार निघतो, असे लोक देखील राज्यपालांच्या विधानावर काहीच बोलले नाहीत, असा टोला रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरे यांना नाव न घेता लगावला.
आजचा मोर्चा सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला आहे. शिवाजी महाराजांविरोधात भाजप नेते सातत्याने बेताल वक्तव्य करत आहेत. त्याविरोधातील हा मोर्चा आहे. भाजपचंही आंदोलन होत आहे. लोकशाहीत त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण त्यांच्या मोर्चाची आणि आमच्या महामोर्चाची तुलना होऊच शकणार नाही. त्यांच्या मोर्चात काही अंध भक्त दिसतील, असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या.
मुख्यमंत्री साहेब तुम्ही कोणतं विकासाच राजकारण केलं? भाजपने एकनाथ शिंदेंना कुठल्या विकासासाठी फोडलं होतं? आपण गुहाटीला कुठल्या विकासासाठी गेला होता? फक्त सूडबुद्धीचे राजकारण हे लोक करतात आणि त्याचाच विरोध आजच्या महामोर्चातून करणार आहोत, असं त्या म्हणाल्या.
राज्यपाल बोलले तेव्हा एकनाथ शिंदे यांनी अळीमिळी गुपचिळी भूमिका घेतली होती. एकनाथ शिंदे आणि त्यांचा ग्रुप आपल्या स्वतःवर कारवाई होऊ नये म्हणून भाजपसोबत गेला, असा आरोप त्यांनी केला.
आमचा आजचा मोर्चा यशस्वी होत आहे म्हणून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आम्ही सगळे पक्ष पूर्ण ताकतीने आजच्या मोर्चा उतरत आहोत. सरकार सातत्याने कुरघोडीचं आणि तोडफोडीचं राजकारण करत आहे. आमच्या आंदोलनामुळे सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, असा दावा त्यांनी केला.
राज्यपालांच्या विधानानंतर भाजपने राज्यपालांना काळे झेंडे का दाखवले नाही. भाजप फक्त सोयीचं राजकारण करत आहे. या सरकारचा बुरखा आम्ही फाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.