दौंड (पुणे) : सुहास कांदे (Suhas Kande) खालच्या दर्जाचे राजकारण करीत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये असते तर तेव्हाच एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले असते, असा घणाघात विधान परिषदेतील आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी सुहास कांदे यांच्यावर केला आहे. नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या, त्यावेळी दोन्ही गृहमंत्र्यांनी राज्य आणि कॅबिनेट त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा विचार केला होता. पण उद्धव ठाकरे यांनी सकाळी 8.30 वाजता शंभूराज देसाई यांना फोन करून एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) सुरक्षा देऊ नका, असे सांगितले, असा दावा सुहास कांदे यांनी केला होता. यावर सचिन अहिर यांनी सुहास कांदे यांच्यावर प्रतिहल्ला करत आरोप खोडून काढले आहेत.
माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पर्यावरण ऱ्हासाच्या कारणामुळे आरेमधील प्रस्तावित कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या स्थगितीबाबत मोठा निर्णय घेत या कामावरील स्थगिती उठवली. यावर व्यक्तीद्वेष म्हणून निर्णय घेतला, याबाबत विधानसभेत भूमिका मांडू, सरकारला जाब विचारणार, असे विधानरिषदेतील आमदार सचिन अहिर सांगितले. ते आज पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात शिवसेना पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
संरक्षणाच्या बाबतीत एक वेगळी समिती असते. कोणताही मंत्री असला त्याला विविध स्तरावर सुरक्षाव्यवस्था असते. त्यामुळे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या सुरक्षेबद्दल काही सूचना दिल्या, हा जावईशोध सुहास कांदेंनी कुठून लावला त्यांनाच माहीत. कुटुंबात मतभेद असतील तरी कोणी एवढ्या खालच्या थराला जात नाही. हे एवढ्या पोटतिडकीने बोलण्यापेक्षा तेव्हाच का नाही बोलले, एवढे दिवस झोपला होतात का, असा संताप अहिर यांनी व्यक्त केला.