पुणे : पंकजाताई मुंडे (Pankaja Munde) यांना आमदारकी, मंत्रीपद मिळवायचे असेल तेव्हाच ओबीसी आरक्षणाची आठवण येते, अशी टीका रिपाइं खरात गटाचे नेते सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. शिंदे-फडणवीस सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार नुकताच झाला. त्यात पंकजा मुंडे यांना मंत्रीपद दिले गेले नाही. तसेच मंत्रिमंडळात (Cabinet) महिलांनाही स्थान देण्यात आले नाही. त्यानंतर राज्यात यावरून शिंदे-फडणवीस यांच्यावर टीका होत आहे. याविषयी पंकजा मुंडे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. आपली पात्रता नाही, असे पक्षाला वाटत असेल, म्हणून मंत्रीपद मिळाले नसेल, असा टोला त्यांनी स्वपक्षालाच लगावला होता. तर आपण काम करत राहणार. पदाच्या अपेक्षेने काम करत नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. यावर आता रिपाइं खरात गटाच्या सचिन खरात यांनी टीका केली आहे.
ज्या वेळेला मंत्रीपदाची चर्चा होते, त्या प्रत्येकवेळी पंकजा मुंडे यांचे नाव समोर येते. तसेच ज्या ज्या वेळेला पंकजा मुंडे यांना मंत्रीपद, आमदारकी मिळवायची असते, त्या प्रत्येकवेळी त्यांना ओबीसी आरक्षणाची आठवण येते. हे राज्यातील जनतेला माहीत आहे. आमच्या पक्षातर्फे आम्ही पंकजाताईंना विनंती करतो, की ज्या पक्षाला तुम्ही आमदारकी आणि मंत्रीपद मागत असता त्याच पक्षाने ओबीसींना 1989मध्ये व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार ओबीसींना आरक्षण दिले होते. त्याला भाजपाने विरोध केला होता.
ओबीसी आरक्षणाला विरोध केलेल्या पार्टीसोबत आपण काम करत आहात. ज्यावेळेला तुम्हाला मंत्रीपद हवे असते, त्यावेळेला तुम्ही ओबीसी आरक्षणाचा विषय काढता. मात्र आपण जेव्हा मंत्रीपदावर होता, त्यावेळेला आपल्याला कधीही ऊसतोड मजूर, ओबीसींचे प्रश्न आठवले नाहीत. तुम्हाला ओबीसींबद्दल खरेच काळजी असेल, तर मंत्रीपदे आणि आमदारकी मागण्यापेक्षा ओबीसी आरक्षण विरोधी भाजपातून बाहेर पडावे, असे आव्हान सचिन खरात यांनी पंकजा मुंडेंना दिले आहे.