पुणे : खारघर येथे सत्ताधाऱ्यांनी राजकीय स्टंटबाजी केल्यामुळेच उष्माघाताने 11 जणांना प्राण गमवावे लागल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांच्या या आरोपाचा माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी समाचार घेतला आहे. मला कुणावर टीका करायची नाही. हा राजकीय स्टंट होता अशा वल्गना विरोधक करत आहेत. तुम्ही काय गोट्या खेळताय का? तुम्ही सुद्धा तिथे राजकारण करत आहात. तुम्ही काय गोमूत्र शिंपडून पवित्र होऊन मुंबईत बसलेले नाहीत. तुम्ही राज्याच्या प्रश्नावर किती जागरूक आहात? किती आवाज उठवला? तुमची भांडणं खुर्चीसाठी सुरू आहेत. विरोधकांवर बोलण्यात काही अर्थ नाही. ते लायसन्सधारक दरोडेखोर आहेत, असा हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी केला.
ज्यांना एखादं पद मिळतं, पुरस्कार मिळतो तेव्हा चाहते आपुलकीच्या भावनेतून कार्यक्रमाला जात असतात. अशावेळी नियोजनात समन्वय राहत नाही. चाहते किती येणार याचा अंदाज येत नसतो. त्यामुळे सरकार असो की संस्था त्यांना नियोजन करणं कठिण जातं. अनेक कार्यक्रमात पास लावून कार्यक्रम घेत असतो. पण खुल्या कार्यक्रमात ती सुविधा नसते, असं सदाभाऊ खोत म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार का? असा सवाल खोत यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी मार्मिक उत्तर दिलं. राजकारण म्हणजे गोंधळ आहे. केवळ वातावरण निर्मितीसाठी राजकारण केलं जातं. एखादा नेता सोडणार अशी चर्चा रंगली की त्यात स्वपक्षीय आणि विरोधकही सामील होतात. नंतर तो नेता सोडून गेला तर तो सोडून जाणार असं आम्ही आधीच सांगितलं होतं, असा दावा करून मोकळे होतात. नेता नाही गेला तर यूटर्न घ्यायलाही हे राजकीय पक्ष मोकळे होतात. राजकारणी दोन दगडावर पाय ठेवून असतात. महाराष्ट्रातील राजकारण पोरखेळ झाला आहे. चेष्टेचा विषय झाला आहे. अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या या त्या वातावरण निर्मितीचाच भाग आहे, असं त्यांनी सांगितलं.
अजितदादा पहाटेची शपथ घेऊन आले होते. परत यायला काय झालं? राजकारणात कोण कुठेही जाऊ शकतो. राजकारणातील सत्तेची खुर्ची म्हणजे संगिताची खुर्ची आहे. आवाज आला तर गडी नाचायला लागत असतात, असं सूचक विधानही त्यांनी केलं.
यावेळी त्यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीवरही भाष्य केलं. सरकारने शेतकऱ्यांना मदत द्यायला हवी. योग्य ते निकष लावा आणि हेक्टरी किती मदत करता येईल हे जाहीर करा. अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याचं मोठं नुकसान झालं आहे. राज्य सरकारने तातडीने मदतीची घोषणा करावी. विरोधकांचा सरकार असताना देखील यांनी शेतकऱ्याला असंच वाऱ्यावर सोडलं होतं, त्यांनी टीका करू नये. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही, असं त्यांनी सांगितलं.