पुणे : लॉकडाऊनच्या काळात सतत सहा महिने विविध मागण्यांसाठी व मदतीसाठी आंदोलन करून सलून व्यवसायिकांना सरकारने कोणतीही मदत केली नाही, असा आरोप करत सोमवारपासून राज्यभर वीज बिलमाफी तसंच विविध मागण्यांसाठी आक्रमक आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचे नाभिक समाज नेते तथा सलून अँन्ड पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशीद यांनी सांगितले. (Saloon businessman will Agitation Against thackeray Government over demand Electricity bill Waiver)
लोकांनी वीज वापरली त्याची बिले भरावीत. कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही, असं वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं. उर्जामंत्र्यांच्या वक्तव्याचा सोमनाथ काशीद यांना निषेध व्यक्त करत आंदोलनाची हाक दिली आहे. उर्जामंत्र्यांच्या भूमिकेने सर्वसामान्यांना मोठा शॉक बसला आहे आहे, असं काशीद म्हणाले.
येत्या सोमवारपासून वीज बिल माफी झालीच पाहिजे, या मागणीसाठी सलून अँन्ड पार्लर असोसिएशनतर्फे आम्ही सरकारविरोधात आक्रमक आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. लॉकडाऊन काळात कवडीची मदत न करणाऱ्या शासनाने खोटी आणि भरमसाठ बिलं आमच्या माथी मारलीत, आम्ही ती भरणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.
लॉकडाऊनच्या काळात दुकाने बंद असताना तसंच कित्येक घरं बंद असताना भरमसाठ लाईट बिलं आलीच कशी? असा संतप्त सवाल व्यावसायिक तसंच सामान्य जनता विचारत आहे. घरे आणि दुकाने बंद असताना अव्वाच्या सव्वा लाईट बिल येणे म्हणजे मीटरमध्ये गडबड करून खूप मोठा भ्रष्टाचार होतोय की काय असा सवाल यानिमित्ताने नागरिक उपस्थित करत आहेत. महावितरण या कंपनीचा सध्याचा स्थिर आकार हा सर्वसामान्यांना न परवडणारा आहे. सध्याचा स्थिर आकार म्हणजे पूर्वीचे महिन्यांचे लाईट बिल होते असे सोमनाथ काशीद यांनी सांगिले.
लॉकडाऊनकाळात वीज ग्राहकांना वाढीव बिलांचा शॉक बसला. आधीच अनेकांचे रोजगार गेले, त्यात वाढीव वीजबिले आल्याने सर्वसामांन्यांचे कंबरडे मोडले. सरकारकडून वीजबिलांमध्ये सवलत मिळेल अशी आशा होती, मात्र आता ऊर्जामंत्र्यांनी सवलत मिळणार नसल्याचं स्पष्ट केल्याने, सर्वसामान्यांना शॉक बसला आहे.
उर्जामंत्री नितीन राऊत नेमके काय म्हणाले
लॉकडाऊन काळातील वीजबिले माफ होणार नाही किंबहुना वाढीव वीज बिलातून सवलत देणे अशक्य असल्याचं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. लोकांनी वीज वापरली आहे त्यामुळे त्यांनी विज बील भरावीत. कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही, अशी भूमिका नितीन राऊत यांनी घेतली आहे.
(Saloon businessman will Agitation Against thackeray Government over demand Electricity bill Waiver)