पुणे : अनाथांचा आधार, हजारो लेकरांची माय अशी ओळख असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं पुण्यात दु:खद निधन (Passes Away) झालं आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या. पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात (Galaxy Hospital) त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. सिंधुताई यांच्यावर महिनाभरापूर्वी हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांची प्राणज्योत मालवली.
सिंधुताई यांच्यावर मागील महिनाभरापासून उपचार सुरु होते. त्यांच्यावर हर्निया संबंधित शस्त्रक्रिया झाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी उपाचाराला प्रतिसाद दिला. मात्र, आज सकाळपासून त्यांनी उपचाराला प्रतिसाद देणं बंद केलं आणि रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांचं निधन झाल्याची माहिती सिंधुताई यांचे निकटवर्तीय सुरेश वैराळकर यांनी दिली.
सिंधुताई सपकाळ यांचं पार्थिव उद्या सकाळी 8 वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता ठोसर पागेत महानुभाव पंथानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. सिंधुताई यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. वर्धा जिल्ह्यातील नवरगाव ही सिंधुताई यांची जन्मभूमी. त्यांचा विवाह वयाच्या 9 व्या वर्षी वयाने 26 वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला होता. घरी प्रचंड सासुरवास होता. कुटुंबात शैक्षणिक वातावरण नव्हतं. नवऱ्याने चारित्र्याचा संशय घेऊन त्यांना घराबाहेर काढलं. घरच्यांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या. एकदा तर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. अनेक दिवस भीक मागितल्यानंतर त्या स्मशानातही राहिल्या. त्यानंतर त्यांनी अनाथ मुलांना सांभाळण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी ममता बाल सदनची स्थापनाही केली. पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. अनाथ, बेवारस मुलांना सांभाळतानाच त्यांना शिक्षण, अन्न, कपडे देण्यास त्यांनी सुरुवात केली. या संस्थेत 1 हजार 50 मुले या राहिलेली आहेत. त्यांनी पुण्यात बाल निकेतन, चिखलदरा येथे सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, वर्ध्यात अभिमान बाल भवन, गोपिका गाईरक्षण केंद्र, सासवडमध्ये ममता बाल सदन आणि पुण्यात सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्थेची स्थापना केलीय.
“माझी प्रेरणा, माझी भूक ही पोटाची, भाकरीची. मी भाकरीला धन्यवाद देतो कारण भाकरीच मिळत नव्हती. माझ्या लेकरांना भाकरी मिळावी म्हणून रानोरान फिरले. लोकांनी मला सहकार्य केलं. त्यावेळी देणाऱ्यांचे, त्या काळात ज्यांनी माझी झोळी भरली त्यांचे आणि मला जगण्याचं बळ दिलं त्या माझ्या लेकरांचा या पुरस्कारावर अधिकार आहे, उरलासुरला माझा,” अशीही भावना सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केली.
इतर बातम्या :