पुणे : राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे मातब्बर नेते शंभुराज देसाई यांनी मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरून त्यांनी हे विधान केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाचे 13 खासदार फुटले आहेत. त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीकडे 19 जागा मागण्याचा अधिकारच राहिलेला नाही. त्यांनी तसा हक्क सांगणे हस्यास्पद आहे. त्यांच्याकडे आता जेवढे खासदार आहेत, तेवढ्याच जागांवर त्यांनी हक्क सांगितला पाहिजे, असं शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे. मी आज लिहून देतो जागावाटपावरून महाविकास आघाडीत एकमत होणार नाही, असा दावाही त्यांनी केला. ते मीडियाशी संवाद साधत होते.
बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा ‘सामाना’च्या अग्रलेखाला एक दर्जा होता, मात्र संजय राऊत जेव्हापासून लिहायला लागलेत तेव्हापासून त्याला दर्जा राहिला नाहीय. त्यामुळे मी अग्रलेख वाचला नाहीये. संजय राऊत जेव्हा आत होते तेव्हा राज्यात शांतता होती. राऊत तुम्ही स्वत:ची काळजी घ्या. आता समर सुरू आहे म्हणून त्यांना परत सरकारी विश्रांतीची गरज आहे. आमच्या समर्थकांच्या भावना दुखवणार नाहीत असं वक्तव्य राऊतांनी करू नये, असा सूचक इशारा शंभुराज देसाई यांनी केला आहे.
संजय राऊत आता जयंत पाटलाचे प्रवक्ते झाले आहेत. ते विश्व प्रवक्ते आहेत. जयंत पाटील कधी तसं बोलले नाहीत, मग संजय राऊतांना स्वप्न पडलं होतं का?, असा सवाल त्यांनी केला. तडजोड करण्याची तुरुंगात ऑफर आली होती हे अनिल देशमुखांना हे सांगायला दोन वर्षे लागली. त्याचवेळी त्यांनी बोलायला पाहिजे होतं. ज्यावेळी चौकशी सुरू असते त्यावेळी बोलत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
शंभुराज देसाई यांनी उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आज होणाऱ्या भेटीवरही टीका केली आहे. एक बरं आहे उद्धव ठाकरेंना शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर जावं लागलं होतं, तसं केजरीवालांच्या भेटीसाठी दिल्लीला जावं लागलं नाही, असा चिमटा त्यांनी काढला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात विरोधक कितीही एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही. मोदींना कितीही आव्हान देण्याचा प्रयत्न केला तरी देशात काही फरक पडणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
मंत्रिमंडळ विस्तार कधी करायचा याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुखमंत्र्यांचा आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर बोलण्याचा अधिकार आम्हाला नाही. लवकरच मंत्री विस्तार होईल. कुणाला मंत्री करायचे आणि कुणाला नाही हा अधिकारही या दोघांचाच आहे, अशी सावध प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. कुणाला मंत्री करायचं, कुणाला महामंडळावर घ्यायचं याचा सर्वस्वी अधिकार शिंदे आणि फडणवीसांना आहे. सर्वांना समान न्याय देणारं धोरण शिंदे-फडणवीस स्वीकारतील असा विश्वास आहे, असंही ते म्हणाले.