आताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, अशी टीका शिंदे गटाचे खासदार आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय मंडलिक यांनी केली होती. मंडलिक यांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. हा कोल्हापूरच्या गादीचा अपमान असल्याची टीका करण्यात येत आहे. याबाबत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना विचारण्यात आलं असता पवार यांनी संजय मंडलिक यांना फटकारलं आहे. शाहू महाराजांबाबत सामान्य लोकांमध्ये कृतज्ञता आहे. असं असताना शाहू महाराजांबाबत हा सवाल करणं याचा अर्थ राजकारण किती खालच्या पातळीवर गेलं आहे हे दिसतंय, असं शरद पवार म्हणाले.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. राजघराण्यात मूल दत्तक घेणं ही नवी पद्धत नाही. दत्तक मूल घेतल्यावर तो त्या घराण्याचा प्रतिनिधी होतो. आज ज्यांच्याबद्दल बोललं जात आहे, याचा अर्थ किती खालच्या पातळीवर प्रचार सुरू आहे हे दिसतं. शाहू महाराज यांची जनमाणसात चांगली प्रतिमा आहे. त्यांचं सामान्य माणसात चांगलं काम आहे. शाहू महाराजांबद्दल लोकांच्या मनात कृतज्ञता आहे. असं असताना त्यांच्याबद्दल बोललं जात आहे, याचा अर्थ मानसिकता काय आहे हे लक्षात घ्या, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांनी यावेळी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर चिमटा काढला. त्यांनी भाजपविरोधात कठोर भूमिका मांडली होती. आता त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यांनी नक्की काय केलं माहीत नाही. कशाची अपेक्षा न करता पाठिंबा दिला असं सांगितलं जात आहे. एक दोन दिवसात काही माहिती मिळेल, असा चिमटा शरद पवार यांनी काढला.
एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जात आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. त्यांच्या इतक्या चौकश्या सुरू केल्या, त्यांच्या व्यक्तिगत प्रॉपर्टीवर बंधनं आली. दैनंदिन कुटुंब चालवण्यासाठी ज्या गरजा आहे, त्या भागवता येत नव्हत्या, इतकी टोकाची भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली होती. त्यामुळे ते हतबल झाले होते. त्यांनी माझ्याशी चर्चा केली. यातनेतून सोडवणूक करण्यासाठी तुम्हाला जे सोयीचं पडेल तिथे गेल्यास आम्ही गैरसमज करून घेणार नाही, असं मी त्यांना सांगितलं होतं, असं पवार यांनी स्पष्ट केलं.
खडसेंची विधान परिषद काढून घेणार का? असा सवालही त्यांना करण्यात आला. त्यावर विधान परिषदेबाबत निर्णय घेणार नाही. दिलेल्या गोष्टी परत घेतल्या जात नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं. तर, रोहिणी खडसे यांनी पक्षाचंच काम करणार असल्याचं सांगितलं. खडसे जी भूमिका घेतात त्यावर भाष्य करायचं नाही असंही त्या म्हणाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
विविध संघटनेत अतिशय चांगले काम करणारे अनेक सहकारी राष्ट्रवादीत येत आहेत. त्यात अतुल देशमुखांनी आज निर्णय घेतला. गेली अनेक वर्ष एका विशिष्ट विचारधारेने लोकांचं काम करण्याची भूमिका ते बजावत होते. लोकांच्या समस्या मांडणं आणि भाजपच्या धोरणात फरक आहे, हे पुन्हा पुन्हा जाणवल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. राष्ट्रवादीत त्यांचं स्वागत आहे. हे चित्र दिवसे न् दिवस मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. येत्या 16 तारखेला आमच्या पक्षात धैर्यशील मोहिते येणार आहे. दोन दिवसांनी त्यांच्या पक्षाचा प्रवेश होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.