पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अत्यंत खोचक शब्दात टीका केली आहे. पवार यांना चद्रकांत पाटील यांच्याविषयीचा पत्रकारांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. चंद्रकांत पाटील यांचं नाव पत्रकारांनी घेताच शहाण्या माणसाबद्दल विचारा, असं म्हणत शरद पवार यांनी पत्रकारांचा प्रश्न उडवून लावतानाच चंद्रकांतदादांचा एका वाक्यात पाणउतारा केला. कसब्याचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवारांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.
हा फक्त रवींद्र धंगेकरांचा विजय आहे. महाविकास आघाडीचा नाही, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. शरद पवार यांनी या विधानावरून फडणवीस यांनाही चिमटे काढले. ज्यांचा विजय झाला असे विजय देणारे उमेदवार आमच्या सर्वांचे होते हे तरी त्यांनी मान्य केलं. या निवडणुकीच्या आधी त्यांची विधाने काय होती. हे वाचनात आले होते. त्यात आता गुणात्मक बदल झाला आहे. कमीत कमी निवडून आलेल्या व्यक्तीबद्दल ते चांगलं बोलतात ही चांगली गोष्ट आहे, असा चिमटा शरद पवार यांनी फडणवीस यांना काढला.
कसब्याची निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नेण्याचा भाजपचा प्रयत्न होता. या प्रश्नावरही त्यांनी थेट उत्तर दिलं. ही निवडणूक हिंदुत्वावर गेली की नाही हे मला माहीत नाही. महाविकास आघाडीसाठी सर्व नेते, पदाधिकारी काम करत होते. उमेदवाराबद्दल सर्व स्तरात चांगलं बोललं जात होतं. त्याचा हा परिणाम आहे, असं शरद पवार म्हणाले. तसेच मी लोकांना विचारलं. बहुसंख्य लोकांनी सांगितलं आघाडीचा उमेदवार म्हणून आम्ही मतदान केलं. धंगेकरांबद्दल लोकांची मान्यता होती. धंगेकरांनी केलेल्या कामाची नोंद या भागातील लोकांनी घेतली, असं त्यांनी सांगितलं.
कसब्यात पैशाचा वापर झाला. मला काही लोकांनी मोबाईलवर नोटांचे फोटो दाखवले. फोटो दाखवणारे राजकीय पक्षाचे नव्हते. ते सामान्य लोक होते. तसेच काही लोकांनी सांगितलं आम्ही वेगळ्या विचारसरणीला मानणारे लोक आहोत. पण या निवडणुकीत पैशाचा वापर झाला. ते पाहिलं आणि आम्ही वेगळा निर्णय घेण्याचं ठरवलं. ट्रॅडिशनल व्होटरला ते आवडलं नाही. पण भाजप ते मानायला तयार नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.
उद्धव ठाकरे यांच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकं असतील तर आनंद आहे. कारण आज शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तिघे एकच भूमिका मांडत आहेत आणि या तिन्ही पक्षांची ताकद कालच्या सभेत दिसली, असं ते म्हणाले.