सुनिल थिगळे- प्रतिनिधी टीव्ही 9 मराठी, मांडवगण फराटा- शिरूर | 04 मार्च 2024 : शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा इथं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थित शेतकरी मेळावा होत आहे. या मेळाव्या दरम्यान अजित पवारांना पाठबळ देण्यासाठी शेतकरी मेळाव्यातुन गावोगावचे सरपंच, सदस्यांचा, सोसायटी चेअरमन अशा अनेकांना पक्षप्रवेश देण्यात आला. या कार्यक्रमात अजित पवार गटाचे नेते बोलत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष रवी काळे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर घणाघात केलाय.
खासदार अमोल कोल्हे यांनी मानधनासाठी नथुराम गोडसेची भुमिका साकारली. आता मानधनासाठी औरंगजेबाचीही भूमिका साकारतील, असं म्हणत शिरुरच्या शेतकरी मेळाव्यातून अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष रवी काळे यांनी अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधलाय.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अमोल कोल्हे यांनी साकारली. त्याचा अभिमान ठेवून लोकांनी त्यांना साथ दिली. अजित पवार आणि दिलीप वळसे पाटीलांनी पाच वर्षापुर्वी राजकीय रणनिती आखली. त्यामुळे खासदार अमोल कोल्हेंचा विजय झाला. पण काहीच दिवसात तुम्ही मानधनासाठी नथुराम गोडसेची भुमिका केली. पुढच्या काळात मानधनासाठी औरंगजेबाचीही भूमिका कराल असं म्हणत अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष रवी काळेंनी भावना व्यक्त करत खासदार कोल्हेंवर निशाना साधला आहे.
शिरुरचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवार यांच्या होमपिचवर अजित पवारांचा मेळावा होत आहे. शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा इथं अजित पवार गटाचा शेतकरी मेळावा होत आहे. मांडवगण फराटा इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सहा जेसीबी मधून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमात अजित पवार गटाच्या नेत्यांची भाषणं झाली.
घोडगंगा साखर कारखान्याचे माजी चेअरमन दादा फराटे यांनी या बोलताना शिरूर लोकसभा मतदारसंघावर भाष्य केलं. अजित दादा तुम्ही जो उमेदवार द्याल. त्या उमेदवाराला विजयी करण्याचा विश्वास देतो. तुम्ही तिकिट देऊन निवडून आणू शकता तर त्यांना पाडू ही शकता, असा टोला अजित पवारांच्या समोर दादा फराटेंनी खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवार यांना लगावला.