योगेश बोरसे, Tv 9 मराठी प्रतिनिधी, पुणे : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी 2014 मध्ये शिवसेनेकडून प्रस्ताव आला होता, अस वक्तव्य केलं. अशाप्रकारची प्राथमिक स्वरुपाची चर्चा झाली होती, असं काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले. पण, ती चर्चा पुढं जाऊ शकली नाही. त्यावेळी भाजप सत्ता स्थापन करण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळं आम्ही काही वेगळा विचार केला नाही, असंही ठाकरे म्हणाले. काँग्रेसचे नेते आणि शिवसेना यांच्यात प्राथमिक चर्चा झाली होती. पण, नेमकी काय चर्चा झाली होती, हे सांगणं माणिकराव ठाकरे यांनी टाळलं.
एकनाथ शिंदे यांना विचारा म्हणजे ते सांगतील काय चर्चा झाली होती, असंही त्यांनी म्हटलं. खर तर एकनाथ शिंदे यांचं भाजपशी जुळत होतं, असं वाटत नाही. त्यामुळं काँग्रेससोबत चर्चा झाली होती, असं माणिकराव ठाकरे यांनी सांगितलं.
महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आम्ही एकत्र आहोत, असंही ठाकरे म्हणाले. काँग्रेस पक्ष राज्यात एक नंबरवर यावा, यासाठी नाना पटोले यांच्याकडं जबाबदारी आहे. त्यामुळं पक्ष वाढीसाठी ते योग्य ते बोलत असल्याचं माणिकराव ठाकरे म्हणाले. आजतरी त्यांच्याहून वेगळी अशी आमची काही भूमिका नाही, असंही त्यांनी सांगितलं.
पंकजा मुंडे यांना पक्षात वाईट वागणूक दिली जात आहे, अशी लोकांमध्ये चर्चा आहे. पक्षाकडून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. मात्र हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे.
आशिष शेलारांकडे नेमकी कुठली क्लिप आहे मला माहिती नाही. मात्र हे डिवचण्याचं काम आशिष शेलार करत आहेत. उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना राहणार आणि त्यांचेच चिन्ह राहणार आहे. निवडणूक आयोगाने अद्याप निर्णय घेतला नाही. याबाबत निवडणूक आयोग तटस्थपणे निर्णय घेणार आहे.
एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील आमदारांनी बोलून काय उपयोग. कारण सरकार तर फडवणीस आणि भाजप चालवत आहेत. सर्व निर्णय देवेंद्र फडणवीस घेत आहेत.
संत गाडगेबाबा यांच्या नावाने दहा सूत्री कार्यक्रम मागच्या सरकारने केला होता. आता या सरकारने तो थांबवलं आहे. फडणवीस यांच्यामुळे तो कार्यक्रम बंद झाला आहे, असाही आरोप त्यांनी लावला.