आंबेगाव, पुणे : एका मुख्यमंत्र्याच्या अभिनंदनाची पोस्ट केली, हा काय माझा गुन्हा, आहे का, असा सवाल करत सकाळी अनेकांचे मला फोन आले, मात्र माझा विश्वास बसेना की माझी हकालपट्टी शिवसेना (Shivsena) पक्षाने केली. मी पेपर वाचल्यानंतर मला समजले मला शॉक बसला की काय बोलावे आणि काय प्रतिक्रिया द्यावी, अशी खंत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी व्यक्त केली आहे. काल रात्री साडे 10 वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रत्यक्ष माझे फोनवर बोलणे झाले. माझ्या मतदारसंघातील अनेक जण आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भेटायला येणार आहेत. मी ही जाणार होतो, मात्र माझ्याकडे आज जनता दरबार असतो, म्हणून मी गेलो नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले म्हणून अभिनंदन केल्याची पोस्ट केली, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना वाईट वाटले. मंगळवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होतो, तसे बोलणेही झाले होते.
चर्चा असताना तुम्ही कुठे गेले नाहीत, याचा मला अभिमान असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलले. जे जाणार नव्हते अशी लोक गेले. मला तुमचा अभिमान आहे, असे पक्षप्रमुख मला बोलले. महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण तापले आहे. मात्र यात माझी काय चूक, असा सवाल आढळराव पाटील यांनी केला आहे. मी काय कमी केले पक्षासाठी? माझी हकालपट्टी करण्याअगोदर काहीतरी आरोप ठेवायचे, असे ते म्हणाले. मी अठरा वर्ष शिवसेनेसोबत प्रामाणिक आहे. राष्ट्रवादीसोबत संघर्ष केला, समर्थपणे लढाई करत आहे. पण राष्ट्रवादीला अंगावर घेतले, त्याचीच फळ मी भोगत आहे. मी एकट्याने राष्ट्रवादीसोबत निधड्या छातीने संघर्ष केला. 2009ला शरद पवारांनी मला राज्यसभेची ऑफर दिली होती. दोन टर्म तुम्हाला राज्यसभेवर घेतो. ती मी घेतली नाही. बाळासाहेबांच्या शब्दापुढे मी गेलो नाही. राष्ट्रवादी आम्हाला संपवत आहे. मी मागेही पक्षाकडे तक्रार केली होती, मात्र काहीही झाले नाही, असे ते म्हणाले.
शिवसैनिकांवर होणारे अन्याय मी एकहाती सांभाळत आहे. गेली 18 वर्ष मी प्रपंच, व्यवसाय सगळे सोडले, ते केवळ शिवसेनेसाठी. पराभव झाला तरी मी फिरत आहे. मला ही फळे पक्षाने द्यावीत, असे म्हणत मला खूप लागले आहे, अस्वस्थ झालो आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. मला खूप वाईट वाटत आहे, असे म्हणत असताना प्रेसमध्येच आढळराव भावुक झालेले पाहायला मिळाले. या निमित्ताने पक्षांमध्ये माझी काय किंमत आहे, ते समजले. राष्ट्रवादीला अंगावर घेतले, ही चूक झाली. मी आजपर्यंत शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलो आणि राहणार, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर मी दोन दिवस विचार करून पुढील भूमिका ठरवेल, असे त्यांनी जाहीर केले आहे.
कार्यकर्त्यांना शांत राहण्याची विनंती त्यांनी केली. ते म्हणाले, की जनतेने आणि शिवसेनेने मला मोठ केले आहे. मी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून अफवा आहे की मी भाजपामध्ये जाणार. मात्र मी शिवसेनेसोबत प्रामाणिक आहेच आणि राहणार. दोन दिवस विचार करून पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे आढळराव म्हणाले आहेत.