पुणे : आंदोलकांचा हेतू शरद पवार साहेब (Sharad Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना तसेच पवार कुटुंबीयांना इजा करण्याचा असावा, असे माझे निरीक्षण आहे, असे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) म्हणाल्या आहेत. त्यांना जर त्यांच्या भावना पोहोचवायच्या होत्या तर त्यांनी निदर्शने केली असती. एखादा व्यक्ती उद्दामपणे सातत्याने हिंसेची धमकी देतो, त्यावर आधीच प्रतिबंधात्मक कारवाई होणे आवश्यक होते, असे त्या म्हणाल्या. पोलिसांवर सातत्याने आरोप होत असल्यामुळे त्यांचे नितीधैर्य खचले की काय हे बघायला पाहिजे. केंद्रीय तपास यंत्रणांचा चौकशीचा ससेमिरा लागण्याच्या भीतीमुळे काही पोलीस अधिकारी निष्क्रिय झाले आहेत, असेही नीलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या. कोर्टाचा निकाल त्यांना बांधील होता. मात्र तो निकाल त्यांना धुडकावून लावायचा होता. त्यामुळे पवार कुटुंबीयांची सुरक्षा वाढवणे गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
एसटी कर्मचारी हातात दगड घेऊन आणि चपला घेऊन काल दिसून आले. यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांना चोरांचे सम्राट म्हणत एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शरद पवार आमच्या विलीनीकरणाच्या आड आले. अशा प्रतिक्रिया एसटी कर्मचारी काल देत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यात विविध ठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात आले. शरद पवार यांनीच विलीनीकरणात अडथळा आणला, असा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला तर शरद पवार यांचा एसटी आंदोलनाशी संबंध नसताना अशाप्रकारचे हल्ले होत आहेत. ते खपवून घेतले जाणार नाहीत, असा पवित्रा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीने निषेध मोर्चे काढले. यात पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते.