पुणे : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि मनसे नेते वसंत मोरे यांची पुण्यात भेट झाली आहे. एका लग्नसमारंभासाठी संजय राऊत पुण्यात असताना या दोघांची भेट झाली. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. नगरसेविका संगीत ठोसर (Sangita Thosar) यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने संजय राऊत आणि वसंत मोरे येथे आले होते. स्टेजवरून उतरताना संजय राऊत समोरून आले आणि आपली गळाभेट घेतली असे मोरे म्हणाले. तात्यांना भेटणे आता दुर्मीळ झाले आहे, असे संजय राऊत आपल्याला म्हटल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले. दरम्यान या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्टीकरण वसंत मोरे (Vasant More) यांनी दिले आहे. लग्नसमारंभाच्या निमित्ताने येथे आल्याचे त्यांनी सांगितले.
संजय राऊत आणि वसंत मोरे एकमेकांना भेटल्यानंतर प्रथम राऊत मोरेंना तात्या म्हणाले. ठाण्यातील भाषण आपण ऐकल्याचे राऊत मोरेंना म्हणाले. तर वसंत मोरे म्हणून नाही, तर तात्या म्हणून ओळखले, असे राऊत म्हणाले. वसंत मोरे यांच्या कामाचे कौतुकदेखील त्यांना केले आहे. जाता जाता संजय राऊत मोरे यांना ‘भेटू’ असे म्हणाले. त्यामुळे मोरे आता शिवसेनेच्या जवळ आले की काय, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
मागील काही दिवसांपासून वसंत मोरे अधिक चर्चेत आहेत. मनसे पक्षात असतानाही पक्षावेगळी भूमिका घेतल्याने त्यांना शहराध्यक्ष पदावरून दूर करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या पक्ष सोडण्याच्याही चर्चा कानी पडल्या. मात्र यावर स्वत:च स्पष्टीकरण देत आपण मनसेतच राहणार असल्याचे त्यांनी अनेकवेळा सांगितले. आपल्याला सर्वच पक्षांच्या ऑफर्स आल्या, मात्र आपण राजमार्गावरच राहणार असल्याची ठाम भूमिका त्यांनी मांडली. तर आजही त्यांना विचारले असता, लग्नसमारंभात सर्वच पक्षांचे नेते एकमेकांना भेटत असतात, त्यात कोणतीही राजकीय चर्चा होत नाही, असे मोरे म्हणाले.
प्रभाग 56,57,58 हा अत्यंत चांगला आहे. याठिकाणी वसंत मोरे फॅक्टर चालणार, असे वसंत मोरे म्हणाले. मनसे भाजपासोबत युती करणार का, याचा निर्णय राज ठाकरेच घेतील, असे वसंत मोरे म्हणाले.