पुणे : “पूजा चव्हाण हा विषय राजकीय नाही, तर तो सामाजिक आणि भावनिक आहे. याबाबत पोलीस तपास सुरु आहे. त्यामुळे मी याबाबत कोणतेही वक्तव्य करणार नाही. पोलीस तपासात दिशा भरकटेल, अडथळे येतील, असे वक्तव्य आम्ही करणार नाही,” अशी रोखठोक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. पुण्यात एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Sanjay Raut Comment on pooja chavan suicide)
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. याप्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढतो आहे. राजकीय पातळीवर आरोप प्रत्यारोपांची राळ उडती आहे. नुकतंच याबाबत संजय राऊत यांना विचारले असता, त्यांनी यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली.
“याबाबत मुख्यमंत्री भूमिका घेतील”
“पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी या राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवर आणि कायद्याच्या अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे. राज्यातील सरकार कोणालाही पाठिशी घालत नाही. याप्रकरणाचा तपास सुरु आहे. तो तपास योग्य दिशेने सुरु असावा. राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेवर विश्वास ठेवावा,” असे संजय राऊत म्हणाले.
“संजय राठोड यांच्याशी कधीही एवढा संपर्क झाला नाही. यात पक्षाच्या चर्चेचा संबंध झाला नाही. ते गेले अनेक वर्ष मंत्री आहे. त्यांचे बॉस राज्याचे मुख्यमंत्री आहेत. जोपर्यंत याप्रकरणाचा सत्य समोर येत नाही, तोपर्यंत हे प्रश्न विचारणं चुकींचं आहे. जेव्हा सत्य समोर येईल, याबाबत मुख्यमंत्री भूमिका घेतील किंवा सरकार भूमिका घेईल, तेव्हा मला बोलता येईल. मी पक्षाचा घटक आहे. पण सरकारचा भाग नाही,” असेही संजय राऊत म्हणाले.
मूळ परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात रहात होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप आहे.
अरुण आणि संजय राठोड यांच्या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. अरुण राठोड हा पूजा चव्हाणसोबत राहात होता. एव्हाना तिची जबाबदारी अरुणवरच होती. पूजा थोडी सर्किट आहे म्हणजे हट्टी आहे. ती ऐकणार नाही, असं अरुण मंत्र्याला सांगतो. यावरून पूजाने एकदा निर्णय घेतला तर ती मागे हटत नाही, हे त्याला माहीत असल्याचं स्पष्ट होतं. तसेच पूजासोबत त्याची पूर्वीपासूनच ओळख असावी असाही अंदाज या क्लिपमधील संभाषण ऐकल्यावर येतो.
पुणे पोलिसांनी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात अरुण राठोड (Arun Rathod) याला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी (Pune Police) आज गुरुवारी 18 फेब्रुवारीला अरुणला ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे. पूजाने 7 फेब्रुवारीला रात्री दीडच्या सुमारास आत्महत्या केली होती. त्यानंतर ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या, त्यामध्ये कथित मंत्री आणि अरुण राठोड यांची नावं होती. मात्र अरुण राठोड गायब होता, त्याला अखेर पोलिसांनी पकडलं आहे. (Sanjay Raut Comment on pooja chavan suicide)
संबंधित बातम्या :
जिथे ज्याची ताकद त्याच्या नेतृत्वात लढायचं, आघाडीचं ठरलं; राऊतांनी सांगितला नवा फॉर्म्युला
पुणे महापालिकेसाठी सेना-राष्ट्रवादीची आघाडी, पटोले म्हणतात “पाठून वार करण्याची भूमिका नाही”