सचिन चपळगावकर, टीव्ही 9 मराठी, पिंपरी चिंचवड : कुठेही साप दिसला तर घटनास्थळाहून पळ काढला जातो किंवा सापाला हुसकावण्याचा आणि मारण्याचा प्रयत्न केला जातो. खुप कमी लोक असे असतात, जे सर्पमित्राला बोलावतात आणि सापाची सुखरुप सुटका करतात. असाच एक प्रसंग पिंपरी चिंचवडमध्येही पाहायला मिळाला. अडचणीत असलेल्या सापाची सर्पमित्रांकडून सुटका करण्यात आली.
पिंपरी चिंचवडमधील वाईल्ड अॅनिमल्स स्नेक प्रोटेक्शन सोसायटीला आपल्या हद्दीलगत असलेल्या चांदखेड आणि बेबड ओव्हळ या दोन गावाच्या दरम्याच्या परिसरात धामण जातीच्या सापाचं तोंड अल्युमिनिअमच्या कॅनमध्ये अडकलेलं दिसलं. विशाल माळी यांनी रुग्णाला घेऊन जात असताना हा सर्व प्रकार पाहिला.
विशाल माळी यांनी त्या क्षणाला सापाची सुटका करण्याचा निर्धार केला. तुषार पवार, नितीन, दीपक कांबळे या व्हॉट्सअप ग्रुपमधील सदस्यांना त्यांनी याबाबत माहिती दिली. या सर्वांनी साप आढळलेल्या ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेतला. मोठ्या प्रयत्नानंतर धामणीला शोधण्यात आलं.
गणेश भूतकर, शेखर जांभुळकर, प्रकाश काकडे, तुषार पवार या सर्वांनी आवश्यकतेनुसार सुरक्षित वस्तूंचा वापर करत सापाला कोणतीही इजा न होऊ देता, त्याची सुटका केली.
साप दिसताच त्याला मारणारे किंवा हाकलून देणारे अनेक जण आपण पाहतो. मानवाच्या या धोरणामुळे अनेक जाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळेच साप दिसताच न घाबरता अगोदर सर्पमित्राला बोलावणं आणि सापाला योग्य ठिकाणी मानवी वस्तीपासून दूरवर नेऊन सोडणं हा उत्तम पर्याय आहे.