फलटण बारामती रेल्वे मार्गाला गती, मोदी सरकारने पूर्ण केले माजी खासदाराचे स्वप्न

| Updated on: Mar 14, 2024 | 3:11 PM

बारामती-फलटण रेल्वे मार्गाचे भूमिपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या मार्गाचे उद्घाटन झाले याचा मला खूप आनंद होत असून ही माझ्यासाठी अतिशय भावनिक बाब आहे, कारण माझे वडील आणि तत्कालीन खासदार हिंदुरोजी नाईक निंबाळकर यांनी या मार्गासाठी मोठा संकल्प केला आणि त्यांच्या कार्यकाळात तो मंजूर झाला. त्यामुळे आपण केंद्र सरकारचे मनापासून धन्यवाद मानत असल्याचे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी म्हटले आहे.

फलटण बारामती रेल्वे मार्गाला गती, मोदी सरकारने पूर्ण केले माजी खासदाराचे स्वप्न
Inaugurates Vande Bharat Workshop And Phaltan-Baramati Rail Line
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मुंबई | 14 मार्च 2024 : राजकारणामुळे रखडलेले फलटण – बारामती रेल्वे मार्गाचे काम एकदाचे मार्गी लागले आहे. त्यामुळे डिसेंबर 2025 पर्यंत या रेल्वे मार्गासाठी पुलांच्या बांधणीस आणि इतर कामांना पूर्ण करण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. बारामती फलटण रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी तब्बल 24 वर्षांहून अधिक काळ लागला आहे. अखेर या भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. एकूण 1850 कोटी रुपयांचा हा प्रकल्प एकदाचा मार्गी लागणार आहे. बारामती ते फलटण रेल्वे मार्गाचे स्वप्न माजी खासदार हिंदुराव निंबाळकर यांनी पाहीले होते, ते आता प्रत्यक्षात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरभाष्य प्रणालीद्वारे फलटण बारामती मार्गाचे भूमिपूजन नुकतेच केले. यावेळी लातूर- मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी, बडनेरा येथील वॅगन दुरुस्ती कार्यशाळा आणि पुण्यातील वंदे भारत चेअर कार मेंटेनन्स-कम-वर्कशॉप डेपोसह एकूण 506  प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि राष्ट्राला समर्पित केले. बारामती ते फलटण रेल्वेचे 28 वर्षांपूर्वी माजी खासदार हिंदुराव निंबाळकर यांनी पाहीलेले स्वप्न साकार झाले आहे. त्याचे कौतुक भाजपाचे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी केले. घाणेरड्या राजकारणामुळे फलटण बारामती रेल्वे मार्गाचे काम रखडले होते. या स्वप्नाची सुरुवात माजी खासदार हिंदुराव निंबाळकर यांनी केली होती. आज ते स्वप्न पूर्ण झाले असल्याचे भाजपचे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.

पुणे स्थानकांचा ताण कमी होणार

बारामती फलटण लोणंद या रेल्वे मार्गाला रेल्वे विभागाने सन 1997-98 च्या अर्थसंकल्पात मंजूरी दिली होती. प्रत्यक्षात या प्रकल्पाच्या भूसंपादनाला 20 वर्षांहून अधिक काळ लागला आहे. फलटण लोणंद येथील भूसंपादन पूर्ण होऊन तेथे मार्ग बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता बारामती फलटण हे भूसंपादन रखडले होते. मिरजहून मालगाडी पुणे, दौंड मार्गे मनमाडच्या दिशेने जाते. बारामती फलटण लोणंद मिरज रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर मिरजहून बारामती दौंड मार्गे गाडी मनमाडतडे जाणार आहे. यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होणार आहे. वेळ आणि अंतर यांची बचत होणार आहे. या मार्गावर न्यू बारामती, माळवाडी आणि ढाकाळे ही तीन नवीन स्थानके असणार आहेत.