पुणे : भाजपा नेते (BJP Leader) आणि आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर पीडितेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली आहे. एका महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर गणेश नाईक यांनी झालेल्या अपत्याचा स्वीकार केला नाही. यासंबंधी पीडितेने तक्रार दाखल केली होती. पीडितेच्या या तक्रारीनुसार आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी या महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्याप्रकरणी आयोगाने नवी मुंबई पोलिसांना यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर पोलिसांनी आज गणेश नाईक यांच्याविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देणे व इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवणे हे गुन्हे दाखल केले आहेत. गणेश नाईक यांना याप्रकरणी तत्काळ अटक करण्याची कार्यवाहीदेखील लवकरच केली जाईल, असेही चाकणकर म्हणाल्या.
राज्यात माजी मंत्री संजय राठोड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप झाला. त्यानंतर आता भाजपा आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक यांच्यावरही लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 1993पासून गणेश नाईक यांनी एका महिलेला लग्नाचे आमिष देत, तसेच जीवे मारण्याची धमकी देत लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.
#Pune एका महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.@ChakankarSpeaks #ganeshnaik #crime #Pune
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmGZMLmk pic.twitter.com/354cIMor3Y— TV9 Marathi (@TV9Marathi) April 17, 2022
राज्य महिला आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील एका महिलेनं ऐरोलीचे भाजपा आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात केलेला तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला प्राप्त झाला. त्यात पीडित महिलेने तक्रार केली आहे. गणेश नाईक यांच्यासोबत पीडिता 1993पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. या संबंधातून त्यांना 15 वर्षाचा मुलगा आहे. या महिलेने त्यांचे वैवाहिक अधिकार तसेच त्यांच्या मुलाकरता पितृत्वाचा अधिकार मागितला असता गणेश नाईक यांनी या महिलेला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे.