पुणे : मी असे काहीही केले नाही, ज्यामुळे राज्यसभा निवडणुकीतील माझे मत अवैध ठरवण्यात आले. त्यामुळे याविरोधात याचिका दाखल करणार, असे शिवसेना आमदार सुहास कांदे (Suhas Kande) म्हणाले आहेत. ते पुण्यात बोलत होते. अनिल अंतुरकर यांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते. निवडणूक आयोगाच्या (Election commission) विरोधात याचिका दाखल करणार असल्याचे ते म्हणाले आहेत. जर निकाल माझ्या बाजूने लागला तर निवडणूक आयोगाच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे. माझे मत जर कोर्टाने गृहीत धरले तर निवडणूक नियमबाह्य होते. संजय राऊत (Sanjay Raut) निवडून आले आणि एक मत धरले नाही तर निवडणूकच रद्द होते, असे ते म्हणाले आहेत. दरम्यान, आज सुट्टी असल्याने उद्या याचिका दाखल केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माझी मतपत्रिका दुसऱ्याला दिसेल अशी ठेवली हा आक्षेप अत्यंत चुकीचा आहे. त्यानंतर प्रतोद सोडून इतरांना ती दाखवली, हेही चुकीचे आहे. त्यांना आक्षेप होता तर मतपत्रिका मतपेटीत जाण्याआधी आक्षेप घ्यायला हवा होता. केंद्राच्या निवडणूक आयोगाकडे जायचे असेल तर आमदार योगेश सागरांनाच करायला हवे होते. मुख्तार अब्बास नक्वी यांनी ते केले. त्यांना मुळात अधिकारच नाही. त्यांनी आधी मला नोटीस पाठवायला हवी होती. घटनेनुसार माझे म्हणणे ऐकून घ्यायला हवे होते. हे सर्व हुकूमशाही पद्धतीने झाले आहे. त्याविरोधात मी याचिका दाखल करत आहे, असे कांदे म्हणाले.
माझे म्हणणे ऐकून न घेता हा निर्णय झाला आहे. त्यामुळे माझी प्रतिमा मलिन झाली आहे. कोर्टालादेखील कॅमेऱ्याच्या माध्यमातून तपासण्याची विनंती केली आहे. भाजपाच्या विरोधात नसून निवडणूक आयोगाने अन्याय केला आहे. त्याविरोधात हा निर्णय घेतला असल्याचे सुहास कांदे म्हणाले. तसेच ज्यांनी माझ्यावर आक्षेप घेतला त्यांनीच केंद्रीय आयोगाकडे तक्रार करायला हवी होती. मात्र मुक्तार अब्बास नक्वींनी तक्रार केली, यावर माझा आक्षेप असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनाही मी हे सर्व सांगितले. मुख्यमंत्रीही म्हणाले हा अन्याय आहे, अशी माहिती कांदे यांनी दिली.