पुणे | आगामी निवडणुकांआधी शरद पवार आणि अजित पवार गटामध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. शरद पवार गटाच्या लोणावळ्यामधील कार्यकर्त्यांचा मेळाव्यामध्ये याचीच प्रचिती दिसून आली. शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांनी पदाधिकाऱ्यांना धमकी दिल्याचं आरोपावर बोलताना पवारांनी शेळकेंना इशारा दिला होता. यावर पुरावे द्या त्यानंतर आरोप करा अशी प्रतिक्रिया सुनील शेळके यांनी दिली. त्यासोबतच शेळकेंनी सहा महिन्यांआधी ज्या घडामोडी झालेल्या तेव्हा दादांना व्हिलन करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं.
गेल्या सहा महिन्यात ज्या काही घडामोडी घडल्या त्याचा मीसुद्धा साक्षीदार आहे. आपण भारतीय जनता पक्षासोबत किंवा महायुतीसोबत जायचं तेव्हा तुम्हीदेखील होतात. मात्र ऐनवेळेला तुमची भूमिका बदलून तुम्ही दादांना व्हिलन करण्याचा जो काही प्रयत्न करत आहात तो करू नका. इतकंच माझा सांगण्याचा उद्देश असल्याचं सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.
शरद पवार हे आमचे श्रद्धास्थान आहेत. शरद पवार यांनी वक्तव्य करताना शाहनिशा करायला हवी होती. नेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करायचा आहे. पण ही माहिती खोटी होती, 35 ते 40 कार्यकर्ते तिथे उपस्थितीत होते. एकतरी माणूस दाखवा की मी कोणाला धमकी दिली. तो माणूस समोर आणा. नाहीतर मी महाराष्ट्राला सांगणार की शरद पवारांनी माझ्यावर खोटे आरोप केले. अजित पवार यांना साथ देणं हे माझं वैयक्तिक मत होतं. शरद पवार यांनी माझ्यावर टीका करणं हे मला कधीच अपेक्षित नव्हतं, असं शेळके म्हणाले.
मला असं समजलं की, तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं येतायत म्हणून धमकी दिली. मी त्यांना सांगू इच्छितो. सुनील शेळके तू आमदार कोणामुळं झाला? तुझ्या सभेला कोण आलं होतं? पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे. हे लक्षात ठेवं. मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नसल्याचा इशारा शरद पवार यांनी दिला होता.