अभिजीत पोते, प्रतिनिधी -टीव्ही 9 मराठी, पुणे | 23 ऑक्टोबर 2023 : दौंडमधील स्वामी चिंचोली इथल्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियमच्या इमारतीचं उद्घाटन झालं. अजित पवार यांनी भाजसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पवार कुटुंब पहिल्यांदाच एका मंचावर आल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे हे एकाच मंचावर होते. मात्र यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात अबोला पाहायला मिळाला. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी एका वाक्यात उत्तर दिलं.
शरद पवार आणि अजित पवार यांच्यात काल अबोला पाहायला मिळाला. यावर सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं. आमच्यात विचारांची प्रगल्भता आता आली आहे. प्रत्येकाची एक वैचारिक बैठक असते आणि एक कौटुंबिक असते. आमची लढाई भाजपच्या विचारधारे विरोधात आहे. त्यांच्या धोरणांच्या विरोधात आमची लढाई आहे. ही लढाई वैचारिक आहे पण ही वैयक्तिक लढाई नाहीये, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली मात्री बोलणं झालं का?, असं विचारण्यात आलं तेव्हा डायलॉग इस मस्ट!, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शरद पवार यांचा आजचा सोलापूर दौरा अचानकपणे रद्द झाला. यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलंय. कदाचित इंडिया आघाडीची बैठक असावी. मला माहिती नाही की शरद पवार यांचा दौरा रद्द का झाला, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मराठा समाजात अस्वस्थता असेल तर राज्य सरकारने दखल घ्यावी. एक सर्वपक्षीय बैठक बोलवावी. तरुणांनी, कृपया करून आत्महत्या करू नका. अनेक घटक आरक्षण मागत आहेत. या सगळ्यांबद्दल एक विशेष अधिवेशन बोलवा. राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी. राज्य प्रचंड अस्थिर आहे. सरकारने याची दखल घ्यावी, ठोस पावलं उचलावीत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
जे गृहमंत्री टीव्हीवर असायचे आता आम्ही त्यांची वाट बघतोय. खोके सरकार फक्त खोक्याचा धंदा करतंय. देवेंद्र फडणवीसजी जबाब दो. गृहमंत्री यांना महाराष्ट्राला उत्तर द्यावं लागेल, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.