पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) हे अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहे. त्यांच्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातूनच विरोध होत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा अयोध्या (ayodhya) दौरा वादात सापडला आहे. हा वाद सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अयोध्येच्या दौऱ्यावरून राज ठाकरे यांना डिवचले आहे. भारत हा सुंदर देश आहे. सर्वच भारतीयांना एक विनंती आहे की, काश्मीर ते कन्याकुमारी सर्वच भारतीयांनी भारत दर्शन करावं. पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारत एक खोज नावाचं एक अप्रतिम पुस्तक लिहिलं आहे. मी वाचलं आहे. मीही देश फिरलेली आहे. तसंच जर सर्व करत असतील तर देशासाठी चांगलंच आहे, असा टोला सुप्रिाय सुळे यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आज पुण्यात इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केलं आहे. सुप्रिया सुळेही या आंदोलनात सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढण्याबाबत अजून आघाडीचं ठरलेलं नाही, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं होतं. त्याकडे सुप्रिया सुळे यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर, पवार साहेब जे ठरवतील तोच आमचा फायनल निर्यणय असेल, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.
पिंपरी चिंचवड महापालिकेनं तृतियपंथीयांना दर महा 3 हजार रुपये मदत करण्याचा जो निर्णय घेतलाय त्याचं मी स्वागत करते. राज्य सरकार आणि इतरांनीही हा निर्णय घेता आला तर पहावं, असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं पहिल्यांदा युवती काँग्रेस आघाडी काढली आणि मग इतर पक्षांनी काढली. त्यांच्या या निर्णयाचं मी स्वागत करते, असंही त्या म्हणाल्या.
महागाई राज्यसरकारमुळे वाढली असं केंद्रसरकार म्हणते. ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे तिथे काय आम्ही माहागाई वाढवली आहे का? असा सवाल करतानाच पंतप्रधानांनी लवकरच सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवावी आणि महागाईवर चर्चा करावी, असं आवाहन त्यांनी केलं. तसेच मोदीजी आम्ही तुमच्यावर नाराज नाहीत. तर हैराण आहोत. तुम्ही एवढे संवेदशनशील आहात आणि महागाई कशी काय वाढली? असा टोलाही त्यांनी लगावला.
केंद्र सरकारने पुढच्या आठ दिवसात महागाई कमी करावी, नाही तर राष्ट्रवादी महिला काँग्रेस संपूर्ण राज्यभर रान पेटवेल, असा इशाराही त्यांनी दिला. केंद्र सरकार जोपर्यंत महागाई कमी करत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.