कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात राज्यातील विविध जिल्ह्यात सक्तीच्या वीज बिलवसुली विरोधात आंदोलन करण्यात आले. राज्यभरात सर्वपक्षीय आंदोलनाला कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, बुलडाणा आणि वाशिममध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात पुणे बेंगलोर महामार्ग तब्बल दीड तास रोखून धरण्यात आला. अखेर पोलिसांनी राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेत वाहतूक सुरळीत केली. (Swabhimani Shetkari Sanghtana leader Raju Shetti gave ultimatum to MVA Government over electricity bill issue)
वाढीव वीज बिल आणि सक्तीच्या वीज बिल वसुलीविरोधात महामार्ग रोको करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले. लॉकडाऊन काळातील वीजबिल माफीच्या मागणीसाठी कोल्हापुरातील सर्वपक्षीय संघटनाकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी तब्बल दीड तासाहून अधिक काळ पुणे बेंगलोर महामार्ग रोखून धरण्यात आला. राजू शेट्टींनी यावेळी वीज बिलप्रश्नी निर्णय घेण्यासाठी सरकारला आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे.
कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडणी व सक्तीची थकीत वीजबिल वसुली विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावरील निफाड तालुक्यातील चांदोरी चौफुलीवर रास्तारोको आंदोलन करत निषेध व्यक्त केला. उन्हाच्या तडाख्यात दररोज वाढ होत असल्याने विहिरीनी तळ गाठण्यास सुरुवात केली शेती पिकांना पाण्याची गरज असताना अशातच महावितरणने वीजबिल थकल्याने कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडण्यास सुरुवात केली केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरणच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी रास्तारोको करण्याचा इशारा दिला होता. मात्र, इशाऱ्यानंतर ही वीज कनेक्शन तोडणी सुरू असल्याने आज नाशिकच्या निफाड तालुक्यातील चांदोरी चौफुलीवर घोषणाबाजी करत रस्तारोको आंदोलन करत नाशिक-औरंगाबाद राज्य मार्ग काही काळ अडवण्यात आला. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवासाचा खोळंबा झाला होता. हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिरसाट यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
राज्य सरकारने थकीत विजबिल ग्राहक शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागातील शेतकरी आता जास्त आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत. पवार कुटुंबाची एकहाती सत्ता असलेल्या बारामती इंदापूर तालुक्याच्या सीमारेषेवरील इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्यासमोर शेतकऱ्यांनी रास्ता रोको सुरू केला आहे. रस्त्याच्या दुतर्फा सुमारे एक किलोमीटरहून अधिक वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर शेतकरी संघटनांनी रस्ता रोखून धरला आहे. शेतकऱ्यांची वीज बिल माफी करा. वीज कनेक्शन पूर्ववत करा, अशा मागण्या करत जोरदार घोषणाबाजी करत शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
अन्यायकारक वीज बिल वसुली विरोधात सातारा महावितरण कंपनीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा यांचे वतीने सातारा- कोरेगाव रोडवर महावितरण कार्यालय कृष्णानगर समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आज सकाळी साडे आकरा वाजण्याच्या सुमारास रास्ता रोको करण्यात आला. सर्व पक्षीय पदाधिकारी,कार्यकर्ते,व्यावसायिक,घरगुती ग्राहक शेतीपंप धारक यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मात्र, पोलिसांनी बळाचा वापर करत हे आंदोलन 5 मिनिटात गुंडाळले. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष राजु शेळके यांच्यासह पदाधिकारी आणि पोलिसांच्यात रास्ता रोको दरम्यान चांगलीच धरपकड झाली. यावेळी स्वाभिमानीचे कार्यकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले.
लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, सक्तीची विजबिल वसूली थांबवून कनेक्शन कापणे तात्काळ थांबवावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली नागपूर – औरंगाबाद महामार्गावर पेठ येथे रास्तारोको करण्यात आला. जर सरकारने लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ केले नाही, तर आम्ही ऊर्जा मंत्री सह मुख्यमंत्री यांच्या घरांचे वीज कनेक्शन कापू , असा इशारा रविकांत तुपकरांनी यावेळी दिला. सकाळ पासून चाललेल्या रास्तारोको मुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच – लांब रांगा लागल्याने महामार्गावर दोन तास वाहतूक खोळंबली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ही तैनात होता..
वाशिम जिल्ह्यातील तोडलेला वीजपुरवठा त्वरित जोडण्यात यावा तसेच सक्तीची वीजबिल वसुली बंद करावी. कृषी पंपाचे वीजबिल थकबाकी 100 टक्के माफ करावी यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीनं वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील महावितरण कार्यलयाच्या गेटला हार घालत गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन करण्यात आले. यापुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
वाझेप्रकरणी शिवसेना एकाकी?, राष्ट्रवादी-भाजपच्या गाठीभेटी; नव्या समीकरणाचे संकेत?https://t.co/OzxjoFhrYr#SharadPawar | #UddhavThackeray | #ncp | #shivsena | #SachinVaze | #MansukhHiren | #AntiliaCase | #NIA | #maharashtra | #mahavikasaghadi | #AnilDeshmukh
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 19, 2021
संबंधित बातम्या:
केंद्र सरकारकडून वीजपुरवठ्यासाठी नवे नियम; जाणून घ्या सामान्य नागरिकांना काय मिळणार
ऊर्जामंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक, वाढीव वीज बिलासंदर्भात मनसेची पोलीस ठाण्यात तक्रार
(Swabhimani Shetkari Sanghtana leader Raju Shetti gave ultimatum to MVA Government over electricity bill issue)