पुणे : शिवसेनेचे बंडखोर नेते तानाजी सावंत (MLA Tanaji Sawant) यांच्या समर्थकांनी धनकवडी येथील ऑफिसमध्ये गुलाबाची फुले टाकली आहेत. सकाळी शिवसैनिकांनी या कार्यालयाची तोडफोड केली होती. तानाजी सावंत यांनी मराठा समाजासाठी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांच्या कार्यालयावर भ्याड हल्ला (Attack) होणे निषेधार्ह आहे. आम्ही गुलाबाची फुले टाकून तानाजी सावंत यांना समर्थन देतो, असे या समर्थकांनी म्हटले आहे. पोलिसांनी हल्लेखोरांवर कारवाई करावी ही आमची मागणी आहे. सावंत साहेबांनी शांततेचे अवाहन केले आहे, अन्यथा जशास तसे उत्तर देणार, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे (Maratha kranti morcha) समन्वयक महेश डोंगरे यांनी दिला आहे. तानाजी सावंत आगे बढो, हम तुम्हारे साथ हो, अशी घोषणाबाजी यावेळी तानाजी सावंत यांच्या समर्थकांनी देत कार्यालयात फुले टाकली.
शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना असेच उत्तर मिळणार, असे म्हणत शिवसैनिकांनी तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. धनकवडी येथील बालाजीनगर परिसरात हे कार्यालय आहे. शिवसेनेतून बंड करणाऱ्यांना अजूनही वेळ आहे. त्यांनी परत यावे, अन्यथा त्या सर्वांची अशीच अवस्था होईल, असा इशारा आक्रमक शिवसैनिकांनी दिला होता. सत्ता असताना शिवसेनेत आहे. तो काही मूळ शिवसैनिक नाही, अशी टिप्पणी तानाजी सावंत यांच्यावर करत टीका करण्यात आली होती. तसेच हाच कळीचा नारद आहे, त्यामुळे सुरुवात आता पुण्यातून झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हो लोण पसरेल, असा इशारा शिवसैनिकांनी दिला होता.
तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयावर हल्ला झाला, मात्र हे कार्यालय पक्षाचे नाही. त्यांचे वैयक्तिक कार्यालय आहे. त्यांच्या साखर कारखान्याच्या कार्यालयावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. आम्हाला शांत राहण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. अन्यथा, आम्हाला, तारिख, वार आणि वेळ सांगा. आम्ही तिथे येवून जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा यावेळी तानाजी सावंत समर्थकांनी दिला आहे.