पुणे : इन्स्टाग्राम स्टेटसच्या (Instagram status) वादावरून एकावर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले आहेत. पुण्यात हा प्रकार घडला. इन्स्टाग्रामवरून हा किरकोळ वाद झाला. यात 16 वर्षीय मुलावर धारदार शस्त्रांनी (Sharp weapons) हल्ला केल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. ही घटना वडगाव बुद्रुक येथे रविवारी भरदिवसा घडली. या घटनेत पीडित मुलगा गंभीर (Seriously injured) जखमी झाला आहे. पोलिसांनी सांगितले, की अल्पवयीन मुले आणि त्यांचे साथीदार पीडित मुलाच्या इन्स्टाग्राम स्टेटसमधील मजकुरावर संतापले होते. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा मुलगा एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेला असता, त्यांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून जखमी केले. हल्लेखोरांनी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी हवेत धारदार शस्त्रे फिरवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने शोध सुरू करून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.लहा
क्षुल्लक वादाचे पर्यवसान टोकाच्या भांडणात झाल्याचे या घटनेत आढळून आले आहे. मित्रांमधील स्टेटसचा हा वाद प्राणघातक हल्ल्यापर्यंत गेला. सोळा वर्षीय मुलाला इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवले म्हणून तिघांनी धारदार शस्त्रांनी भर रस्त्यात वार केले. यावेळी या मुलांकडे अशी शस्त्रे कुठून आली, असा सवाल केला जात आहे. हल्ला तर केलाच त्यासोबत शस्त्रे हवेत फिरवून परिसरात दहशतही निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
तिघांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याने पीडित सोळा वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे या मुलास धक्का बसला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पोलिसांनी हल्लेखोर तिघांनाही ताब्यात घेतले आहे. हल्ला करण्यामागचे नेमके कारण काय, हल्ला केलेल्या मुलाशी त्यांचे वैर होते का, धारदार शस्त्रे कुठून आली, कौटुंबिक पार्श्वभूमी काय अशा विविध प्रश्नांचा शोध आता पोलिसांकडून घेण्यात येत आहे.