पुणे : पुणे महापालिकेची निवडणूक कधीही लागू शकते. तसेच पुणे लोकसभेची पोटनिवडणूकही कधीही जाहीर होऊ शकते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी पुण्यावर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. पुण्यात संघटन मजबूत करण्यावर सर्वांचाच भर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुण्यात शिवसेना वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. शिंदे यांच्या या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. ठाकरे गटाचे अनेक नेते शिंदे गटात येताना दिसत आहे. आता शिंदे गटाने पुण्यात ठाकरे गटाचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. ठाकरे गटाच्या एका बड्या नेत्यालाच शिंदे गटात घेतलं आहे. या नेत्याने ठाकरे गटातील सर्व पदांचा राजीनामा दिला असून शिंदे गटाची वाट धरली आहे.
बाळासाहेब चांदेरे असं या ठाकरे गटाच्या नेत्याचं नाव आहे. बाळासाहेब चांदेरे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी ठाकरे गटाच्या सर्व पदांचा त्याग केला आहे. शिंदे गटात ते प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटात प्रचंड खळबळ उडाली आहे. बाळासाहेब चांदेरे हे ठाकरे गटाचे पुण्यातील बलाढ्य नेते आहेत. भोर, पुरंदर आणि हवेली या तीन तालुक्यांची त्यांच्याकडे जबाबदारी होती. या तिन्ही विभागाचे ते जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. त्यांनीच बंड केल्याने ठाकरे गटाची मोठी कोंडी झाली आहे.
बाळासाहेब चांदेरे यांनी ठाकरे गट सोडण्याचं कारण ही दिलं आहे. महाविकास आघाडीत काम करत असताना घुसमट होत होती. पाहिजे तसा वाव मिळत नव्हता. त्यामुळे मी पदाचा राजीनामा दिला आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढवण्याचं काम करू, असं चांदेरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, चांदेरे हे पुणे जिल्ह्यातील बडं प्रस्थ आहे. 2019मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात शिवसेनेकडून अनेकजण इच्छूक होते. विजय शिवतारे, संजय काळे, नितीन कदम , राजेंद्र काळे, कुलदीप कोंडे, रमेश कोंडे, महेश पासलकर, राजेंद्र खट्टी, दत्तात्रेय टेमघरे या त्यावेळच्या शिवसेना नेत्यांसह बाळासाहेब चांदेरे यांच्या नावाचीही चर्चा होती. त्यामुळे आता शिंदे गटात आल्यावर चांदेरे हे अजित पवार यांच्या विरोधात लढणार का? याची चर्चा सुरू आहे.
चांदेरे यांनी पुरंदर, हवेली आणि भोर या तीन तालुक्यात ठाकरे गटाचं मोठं काम केलं आहे. या तीन तालुक्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे शिंदे गटाला या तीन तालुक्यात पाय रोवण्यास मदत होणार आहे. चांदेरे यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाला पुणे जिल्ह्यात फायदा होणार असून ठाकरे गटासाठी मात्र हा मोठा झटका असल्याचं दिसून येत आहे.