पुणे: राज्यातील आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांचं ऑटो रिक्षावालं सरकार आहे. या सरकारचे तिन्ही चाकं पंक्चर असून हे सरकार हलतही नाही आणि चालतही नाही. फक्त धूर सोडतंय, अशा शब्दात भाजप नेते अमित शहा यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारची खिल्ली उडवली.
अमित शहांनी पुण्यात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. राज्यातील आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांचं ऑटोरिक्षावालं सरकार आहे. या सरकारचे तिन्ही चाकं पंक्चर झालेले आहेत. ते चालत नाही. फक्त धूर सोडतं आणि प्रदूषण करतं, अशी टीका करतानाच महाराष्ट्रातील जनतेच्या घराघरात जा. हे सरकार महाराष्ट्राचं कल्याण करू शकते का? असा सवाल करा, असं शहा म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची तब्येत ठिक नाही. त्यांचं आरोग्य उत्तम राहावं. पण जेव्हा त्यांची तब्येत चांगली होती तेव्हाही कुठे ते बाहेर फिरत होते. तेव्हाही सरकार कुठे आहे याचा जनता शोध घेत होती. कोरोना काळात मोदींनी 20 वेळा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. तीन वेळा राज्यपालांशी संवाद साधला. अनेक रुग्णालयांशी संवाद साधला, असंही त्यांनी सांगितलं.
2019मध्ये महाराष्ट्रात निवडणुका होत्या. त्यावेळी मी स्वत: इथे आलो होतो. मी स्वत: शिवसेनेशी संवाद साधला. तेव्हा फडणवीसांच्या नेतृत्वातच निवडणुका लढायचं ठरलं होतं. मुख्यमंत्रीही भाजपचाच होणार हे सुद्धा ठरलं होतं. पण शिवसेना फिरली. त्यांनी हिंदुत्वाशीही तडजोड केली. दोन पिढ्यांपासून ज्यांच्याविरोधात लढले त्यांच्याच मांडीवर जाऊन बसेल आणि म्हणतात आम्ही असं म्हणालोच नाही, असा हल्लाही त्यांनी चढवला.
स्वत: ठरलेल्या गोष्टींवर घुमजाव केलं आणि म्हणतात मी खोटं बोलत आहे. मी खोटं बोलतोय असं थोडावेळ मानूही. पण तुमच्या सभेच्या पाठी जे बॅनर लागत होते त्यावर तुमच्या फोटोची आणि मोदींच्या फोटोची साईज पाहा. तुमच्या फोटोची एक चतुर्थांश साईज होती. प्रत्येक भाषणात तुम्हाला मोदींचं नाव घ्यावं लागत होते. तुमच्या उपस्थित मी आणि मोदींनी सांगितलं होतं की, फडणवीसांच्या नेतृत्वातच निवडणुका लढवल्या जातील आणि एनडीए निवडणूक जिंकल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होतील. पण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं. तुम्ही आमच्यासोबत विश्वासघात केला सत्तेत बसले, असा हल्लाही त्यांनी चढवला.
संबंधित बातम्या:
हिंमत असेल तर राजीनामा देऊन मैदानात या, अमित शहांनी उद्धव ठाकरेंना ललकारले
पुण्याच्या विकासात कोणतीही कसूर ठेवणार नाही, अमित शाहांची पुणेकरांना ग्वाही