पुणे : पुण्यात (Pune) होणारा नास्तिक (Atheist) मेळावा रद्द झाला आहे. पोलिसांच्या (Police) दबावामुळे आज होणारा नास्तिक मेळावा रद्द करावा लागला. भगतसिंग विचारमंचच्या वतीनं गेली सहा वर्ष राज्यभरात नास्तिक मेळावे घेण्यात येतात. कोरोना काळानंतर होणारा हा पहिलाच नास्तिक मेळावा होता. मात्र, रामनवमीच्या दिवशी नास्तिक मेळावा घेतल्याने काही लोकांच्या भावना दुखवल्याचे कारण पोलिसांनी दिले. नास्तिक मेळाव्याच्या आयोजकांवर यापार्श्वभूमीवर दबाव टाकत हा मेळावा रद्द करण्यात भाग पाडले आहे. यावर्षी शरद बाविस्कर आणि तुकाराम सोनावणे हे वक्ते म्हणून येणारे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुग्धा कर्णिक असणार होत्या. विविध वक्त्यांचे विचार ऐकण्याची संधी पुणेकरांना यानिमित्ताने मिळणार होती, मात्र आता हा मेळावात रद्द झाला आहे. आयोजक मात्र नाराज आहेत.
या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत य. ना. वालावलकर यांच्या विवेकी विचार या पुस्तिकेचे प्रकाशन या मेळाव्यात होणार होते. तर पोलिसांनी दबाव टाकून मेळावा रद्द करायला लावल्यावर सोशल मीडियावर महाविकास आघाडी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीकाही होत आहे.