पुणे : महात्मा फुले वाड्याच्या (Mahatma Phule Wada) कमानीवरील वादग्रस्त फलक समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हटवला आहे. माजी नगरसेविकेच्या सासूच्या नावे हा फलक लावण्यात आला होता. फुले वाड्याच्या स्वागत कमानीवर लावण्यात आलेल्या या फलकामुळे वाद निर्माण झाला होता. या फलकासंदर्भात अनेक सामाजिक संस्थांनी आक्षेप नोंदवला होता. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत हा फलक हटवला आहे. कै. लक्ष्मीबाई नारायण हरीहर असा हा फलक (Board) लावण्यात आला होता. विजयालक्ष्मी हरीहर असे माजी नगरसेविकेचे नाव आहे. कमानीवर नाव लावण्याचा विषय आम्ही नाव समितीत मंजूर करून घेतल्याचा दावा हरीहर कुटुंबाने केला होता. तर महात्मा फुले मंडळ, ज्योती मित्र मंडळ आणि अखिल माळी प्रबोधन समितीने यावर आक्षेप घेतला होता. यासंबंधी महापालिका आयुक्तांकडे (PMC Commissioner) तक्रारही करण्यात आली होती.
24 मे रोजी आता ऐतिहासिक महात्मा फुले वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर भाजपाच्या माजी नगरसेविका विजयालक्ष्मी हरीहर यांच्या सासू ‘कै. लक्ष्मीबाई नारायणराव हरिहर’ यांच्या नावाचा फलक लावण्यात आला. त्याखाली मार्गदर्शक म्हणून खासदार गिरीश बापट, आमदार मुक्ता टिळक यांचे नाव दिसते. तर संकल्पना म्हणून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव आहे. त्याखाली विजयालक्ष्मी हरिहर, सम्राट थोरात, आरती कोंढरे व अजय खेडेकर या चार माजी नगरसेवकांची नावे आहेत.
या फलकावर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत तो काढला आहे. नगरसेविकेची मुदत संपल्यानंतर हा फलक लावण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत हा फलक काढला आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा विजय असो अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. निषेध असो निषेध असो, राष्ट्रीय स्मारकाला धक्का लावणाऱ्यांचा निषेध असो, अशा घोषणा महिला कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या. दरम्यान, महापालिका यावर आता काय कारवाई करणार ते पाहावे लागणार आहे. कारण आयुक्तांकडे आधीच यासंबंधी तक्रार विविध संघटनांमार्फत करण्यात आली होती. महापालिकेने तो काढण्याऐवजी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तो फलक काढला आहे. तर संबंधित नगरसेविकेची यावर अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.