पुणे : महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचे दीक्षांत समारंभ (Convocation ceremonies) लवकरच एकाच दिवशी होणार आहेत. सध्या दीक्षांत समारंभ विद्यापीठ (University) प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार प्रमुख पाहुणे आणि जबाबदारीच्या पदावरील व्यक्तींच्या उपलब्धतेनुसार आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांना देण्यात येणारे प्रमाणपत्र एकसमान असावे आणि राज्यात चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले आहे. सामंत म्हणाले, की दिक्षांत समारंभ मे किंवा जून असो, सर्वांसाठी योग्य अशा कोणत्याही महिन्यात पूर्व-निर्धारित तारखेला आयोजित केला जाऊ शकतो. तो इतका भव्य असावा की महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याने त्याची वाट पाहावी, विद्यार्थ्यांना त्याचे आकर्षण वाटावे, असे सामंत म्हणाले. एकाच वेळी कार्यक्रम आयोजित केल्यास अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांच्या उपस्थितीचे नियोजन संबंधित विभागाला करावे लागणार आहे.
दीक्षांत समारंभ सोहळा राज्यातील सर्व 13 विद्यापीठांमध्ये एकाच दिवशी झाला पाहिजे. शिक्षण विभाग याविषयीचे नियोजन करेल आणि राज्य सरकारची मंजुरी घेईल आणि त्याला मंजुरी मिळताच त्याची अंमलबजावणी होऊ शकणार आहे. राज्यपाल कोणत्याही विद्यापीठातून समारंभास उपस्थित राहू शकतात. तर इतर विद्यापीठांमध्ये शिक्षणतज्ज्ञ आणि इतर नामवंत व्यक्ती देखील सहभागी होऊ शकतात, असे सामंत म्हणाले.
ही योजना यशस्वी झाल्यास, एकाच दिवशी लाखो पदवी प्रमाणपत्रे देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल, जो एक विक्रम ठरू शकेल. अशाप्रकारचा विक्रम करण्यास राज्य उत्सुक आहे. यामुळे एक वेगळा आणि स्वागतार्ग असा पायंडा पडेल, विद्यार्थ्यांना अशाप्रकारच्या समारंभाचे आकर्षणही वाटेल, असेही उदय सामंत म्हणाले.