पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची पुण्यातील सभा जंगी होणार आहे. पुणे दौऱ्यावर असताना काल मनसेची बैठक होती. यात त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत. कालच्या मनसेच्या शहर कार्यकारीणी बैठकीत पदाधिकाऱ्यांना या सूचना देण्यात आल्या आहेत. सभेला जास्तीत नागरिकांना येण्याचे आवाहन करा, सभेला गर्दी जमवण्यासाठी प्रयत्न करा, असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. औरंगाबाद मनसेने (Aurangabad MNS) सभेची जशी तयारी केली होती, तशी तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी अयोध्या दौऱ्याची वातावरणनिर्मिती सध्या मनसेकडून होत आहे. त्यापूर्वी राज ठाकरे पुण्यात (Pune) सभा घेणार आहेत. अयोध्येला जास्तीत जास्त नागरिक, पदाधिकारी येण्यासाठी आवाहन करा, अशी सूचनाही राज ठाकरे यांनी केली आहे.
पुण्यातील सभेची तारीख मात्र अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र सभा जंगी होणार आतापासूनच कामाला लागण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ठिकाण, तारीख, वेळ लवकरच कळवण्यात येणार आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेची तारीख आणि ठिकाण आज जाहीर होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः तारीख जाहीर करणार आहेत. मनसेच्या पुण्यातील सभेची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. त्यामुळे औरंगाबादप्रमाणे पुण्यातील सभाही जंगीच होणार असल्याचा कसाय बांधला जात आहे. पुण्यातील या सभेसंबंधी राज ठाकरे स्वतः जाहीर माहिती देणार असल्याचे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी म्हटले आहे. साधारणपणे दुपारपर्यंत मनसेच्या सभेचे ठिकाण जाहीर होणार आहे.
एकीकडे राज ठाकरे शहरातल्या पदाधिकाऱ्यांना सभा जंगी करण्याच्या सूचना करत आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरे पुण्यातून बाहेर पडताच कार्यकर्ते मात्र एकमेकांमध्ये भिडताना दिसून येत आहेत. काल रात्री शिवाजीनगर येथील मध्यवर्ती कार्यालयात मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. मागील अनेक महिन्यांपासून पुण्यात मनसेची धुसफूस पाहायला मिळत आहे. मात्र राज ठाकरेंकडून त्यावर काही तोडगा निघाला नसल्याचे कालच्या ताज्या राड्यावरून दिसून येत आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी सूचना केल्या असल्या तरी पुण्यातील सभा जंगी होणार का, याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.