पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यात 11 ते 13 जूनच्या दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा (Rain) अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणेकर मागील अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहत आहेत. त्यात सुखद धक्का देणारी बातमी हवामान विभागाने (India Meteorological Department) सांगितली आहे. साधारणपणे 11 जूनपासून ते 13 जूनपर्यंत या तीन दिवसांत हलक्या स्वरुपाचा पाऊस बरसणार आहे. 15.6 मिमी ते 64.4 मिमी अशा सरासरीत तो पडेल, असे हवामान विभागाने सांगितले आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील 17हून अधिक जिल्ह्यांमध्ये येत्या काही दिवसांत मान्सूनपूर्व पाऊस (Pre Monsoon rain) पडण्याची शक्यता आहे. 11-13 जून या कालावधीत राज्यभर पावसाचे वातावरण असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाने राज्याच्या काही भागांना काल झोडपले आहे.
पुणे वेधशाळेच्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले, की पुण्यातील पहिल्या मध्यम पावसाच्या अंदाजाला विशेष महत्त्व आहे. विशेषत: या वर्षी मार्च ते मे या संपूर्ण मान्सूनपूर्व हंगामात शहरात केवळ 1.9 मिमी पाऊस झाला आहे तर जूनमध्ये आतापर्यंत पाऊस झालेला नाही. ते पुढे म्हणाले, की येत्या काही दिवसांत, विशेषत: कोकण-गोवा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत मान्सूनपूर्व पावसाच्या चांगल्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रात वरच्या हवेच्या चक्रीवादळाच्या उपस्थितीमुळे राज्याच्या काही भागांमध्ये पश्चिम/दक्षिण-पश्चिमी वारे प्रबळ होत आहेत, असे कश्यपी यांनी सांगितले आहे.
राज्यातील काही भागांत मात्र मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दोन दिवसांपूर्वी कोकणाला या पावसाने झोडपले. त्यानंतर हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला होता. आता कालही राज्याच्या अनेक भागांत त्यात पुण्यासह अहमदनगर, नाशिक, सातारा आदी भागांत पावसाने हजेरी लावली. हवेत गारवा आल्याने उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला तर शेतकरी आपल्या कामाला लागले आहेत.
पुढील दोन दिवसांमध्ये मान्सून राज्यामध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आगामी काही काळात मान्सून हा मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात व्यापला जाणार आहे. तर गोव्यासह दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकात मान्सूनचे आगमन होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना ज्याची प्रतीक्षा होती तो अखेर दोन दिवसांमध्ये दाखल होणार आहे, त्यामुळे आशादायी चित्र निर्माण झाले आहे.