पुणे : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात सादर केलेल्या पेन ड्राइव्ह प्रकरणाचा सीआयडीकडून तपास सुरू आहे. कोथरूडमध्ये दाखल असलेल्या आरोपींच्या घरी पोलीस छाप्यावेळी पंच म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींचे जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली आहे. तेजस मोरे यांचा मॅनेजर राहुल सैतवाल याला सीआयडीने (CID) जबाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे. तर, तत्कालीन सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर राहुल सैतवाल याने गंभीर आरोप केले आहेत. सीआयडीचे समन्स (Summons) येण्याअगोदरपासून आपल्याला अनोळखी नंबरवरून धमक्या येत असल्याचे सैतवाल याचे म्हणणे आहे. या धमक्या प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत येत असल्याचा दावा सैतवाल याने केला आहे. विधानसभेत पेन ड्राइव्ह सादर करून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी खळबळ उडवून दिली होती.
8 मार्चला विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राइव्ह सादर करून राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सरकारकडून विरोधकांना संपवण्याचे षडयंत्र आखले जात असल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला होता. विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांचे अनेक व्हिडिओ असलेला एक पेन ड्राइव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला होता. याच प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे.