पुणे : पुणे जिल्ह्यातील काही तालुके वगळून 12 वीपर्यंतच्या शाळांना तीन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसाच्या (Heavy Rain) पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक 14 ते 16 जुलैपर्यंत सुट्टी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये इंदापूर, पुरंदर, बारामती, दौंड, शिरूर या तालुक्यातील शाळांना सुट्टी नसणार आहे. जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच पुढच्या 48 तासांतही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी (School holiday) जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातही एक दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता जिल्ह्यातील काही तालुक्यांत तीन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परिपत्रक काढून जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) हे आदेश दिले आहेत.
पुढचे 48 तास म्हणजे 14 जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. पुणे शहर, जिल्हा तसेच घाट माथ्याच्या परिसरास रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे घाटमाथ्याच्या ठिकाणी पुढील काही दिवस जाऊ नये, असे वेधशाळेने म्हटले आहे. शहर परिसराला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये वाहतुकीचा प्रश्न त्याचबरोबर रस्त्याकडेची झाडे कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहे. खोलगट परिसरात पाणी साचण्याच्या घटना घडणार आहेत. वाहने चालवताना अनेक अडचणींचा सामना चालकांना करावा लागू शकतो, असे वेधशाळेचे अनुपम कश्यपी यांनी सांगितले. त्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी, ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. पवन मावळात शिवली-भडवली ओढ्याला पूर आल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाले. मात्र शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांची पंचाईत झाली. शिवली- भडवली ओढ्याला पूर आल्याने विध्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. सध्यातरी एक दिवस सुट्टी असल्याने ही चिंता मिटली आहे.