पुणे : दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका ट्रेकरचा दुर्दैवी मृत्यू (Trekker died) झाला आहे. सिंहगडावरील कल्याण दरवाजाजवळच्या पायवाटेवर ही दरड कोसळल्याची घटना घडली आहे. हेमंत गाला (Hemant Gala) असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या ट्रेकरचे नाव आहे. शनिवारी सकाळी दाट धुके असताना 9च्या सुमारास ही घटना घडली. बराच वेळ झाला तरी गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या हेमंत यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यानंतर हेमंत यांच्या घरच्यांनी पोलिसांत हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर गडावर शोधाशोध केल्यानंतर रात्री उशिरा ही बाब सामोर आली. सिंहगडावरील (Sinhagad fort) कल्याण दरवाजाजवळ तटबंदीच्या खालच्या भागातील पायवाटेवर ही दरड कोसळली. पावसाळ्याचे दिवस असल्याने दिवसाही याठिकाणी धुके असते. त्यात ही दुर्घटना सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली.
या घटनेत चार ते पाच ट्रेकर्स थोडक्यात बचावले आहेत. मात्र यात हेमंत गाला या ट्रेकरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शी स्वयंसेवकांच्या प्रसंगावधानामुळे इतर ट्रेकर्स आणि गडावर आलेल्या नागरिकांना याबाबत त्वरित माहिती मिळाल्याने मोठा अनर्थ टळला. गडावर सकाळी सहा वाजता सिंहगड एथिक्स ट्रेक या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे तीनशे स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. सिंहगड पायथ्याशी असलेल्या आतकरवाडी-गोळेवाडी चौक-कोंढणपूरफाटा-कोंढणपूर-कल्याण-कल्याण दरवाजा-नरवीर तान्हाजी मालुसरे समाधी-पुणे दरवाजा-गाडीतळ-आतकरवाडी असा या स्पर्धेचा मार्ग होता.
स्पर्धकांना रस्त्याची माहिती देण्यासाठी जागोजागी सुमारे पन्नास स्वयंसेवक उभे होते. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास चार ते पाच स्पर्धक कल्याण दरवाजाजवळ पोहोचले आणि अवघ्या पाच मिनिटांत मागे दरड कोसळली. कल्याण दरवाजापासून काही अंतरावर खाली उभे असलेल्या नरेश मावानी, संतोश शेळके, हेमंत कांचन आणि इतर दोन स्वयंसेवकांनी दरड कोसतानाची घटना प्रत्यक्ष पाहिली आणि खालून येणाऱ्या स्पर्धकांना याची माहिती देत त्यांना दुसऱ्या पायवाटेने गडावर सुखरूप पोहोचवले. मात्र याच दरम्यान हेमंत गाला हे या दरडीखाली सापडल्याने त्यांचा मृत्यू झाला.
दाट धुक्यामुळे काही दिसत नव्हते. बराच वेळ झाला तरी हेमंत यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांच्या घरच्यांनी शोधाशोध करून पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग असल्याची तक्रार दिली. या दरम्यान शंका आल्याने दरड कोसळली त्या भागात रेस्क्यू टीम आणि स्थानिकांच्या मदतीने हेमंत यांची शोधाशोध करण्यात आली. यावेळी दरडीखाली हेमंत मृतावस्थेत आढळून आले. हेमंत यांच्या जाण्याने ट्रेकर ग्रुपमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
शनिवार, रविवार सुट्ट्यांमुळे गडावर पर्यटकांची गर्दी होत असते. तसेच पावसाचे दिवसदेखील आहेत. त्यामुळे अपघातांची शक्यता लक्षात घेऊन, ट्रेकर्स आणि पर्यटकांनी योग्य ती काळजी घेऊन पर्यटन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे..