पिंपरी चिंचवड : नागरिक (Citizens) सध्या दुहेरी समस्येमध्ये अडकले आहेत. भटक्या कुत्र्यांचा त्रास (Stray dogs) होतो त्यांचा बंदोबस्त करा, अशी तक्रार केली असता अधिकारी सांगतात त्यांना बिस्किट (Biscuits) टाका, त्यांच्याशी मैत्री करा म्हणजे अंगावर धावून येणार नाहीत, असा सल्ला दिल्याची तक्रार ब प्रभागातील जनसंवाद सभेत आलेल्या नागरिकांनी केली आहे. महापालिकेतर्फे प्रत्येक प्रभागामध्ये दर सोमवारी जनसंवाद सभा घेण्यात येते. चिंचवड स्टेशन येथील ब प्रभाग येथे प्रेमलोक पार्क येथील रहिवाशाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी तक्रार केली आहे. या वेळी ब क्षेत्रीय अधिकारी अभिजित हराळे तेथे उपस्थित होते. अधिकारी असे उत्तर देत असतील तर महापालिकेने कुत्र्यांसाठी बिस्किटे पुरवावीत, अशी मागणी नागरिकांनी केली. सभेमध्ये नागरिकांनी आपल्या तक्रारींचा पाढाच अधिकाऱ्यांसमोर वाचला.
भटक्या कुत्र्यांच्या समस्येसह विविध समस्यांना तोंड येथील नागरिकांना द्यावे लागत आहे. दळवीनगर येथील जवळपास 15 ते 20 महिलांनी गेली आठ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने ब प्रभागामध्ये मोर्चा काढला होता. या वेळी पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत टँकर पुरवावेत, अशी मागणी करण्यात आली. याचबरोबर काळेवाडी, विजयनगर याठिकाणी पाणी समस्या, चेंबर-रस्त्यांची दुरुस्ती, रस्त्यावरचे दिवे दुरूस्ती, झाडांची छाटणी, अशा अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या.
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. अनेक ठिकाणच्या स्थानकांना शेड नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची व नागरिकांची गैरसोय होत आहे. चापेकर चौकात बस स्थानकाची सोय करण्याची मागणी करण्यात आली. त्यासोबतच खराब रस्ते. उद्याने व तेथील खेळणी ओपन जीमची दुरवस्था आदी तक्रारी करण्यात आल्या.